ओगलेवाडी : पादचारी मार्ग हे सामान्यपणे पायी चालणार्या लोकांसाठी असतात. वाहनांच्या गर्दीतून पादचार्यांना सुरक्षित चालता यावे आणि विनाअपघात प्रवास करता यावा या हेतूने ते निर्माण केलेले असतात, मात्र ओगलेवाडीत याचा वापर इतर कारणांसाठी केला जातो आहे. फेरीवाले आणि फळविक्रेते यावर दुकाने थाटून व्यवसाय करीत आहेत.
चौपदरीकरणांतर्गत कराडला जोडणारे सर्व रस्ते प्रशस्त झाले. त्यांच्या बाजूने पादचारी मार्ग ही तयार केले गेले. बाजारपेठेच्या ठिकाणी याचा वापर करून नागरिक सुरक्षित प्रवास करीत होते. यामुळे अपघातही कमी झाले होते. हे काही दिवस व्यवस्थित सुरू होते .मात्र मागील काही दिवसांपासून या मार्गावर फळविक्रेते आणि इतर व्यावसायिकांनी कब्जा केला आहे. त्यावर अतिक्रमण करून ते आपला व्यवसाय करीत आहेत. पादचारी मात्र जीव धोक्यात घालून रस्त्यावरून प्रवास करीत आहेत.
ओगलेवाडी ही कराडलगतची मोठी बाजारपेठ आहे. तसेच येथील मंडईही खूप मोठी आहे. शेतकरी स्वत: येथे आपला माल विक्री करीत असतात. त्यामुळे येथे स्वस्त आणि ताजा भाजीपाला मिळतो. तो खरेदी करण्यासाठी येथे दुपारी ४ नंतर मोठी गर्दी होते. तेव्हा हे पादचारी मार्ग खूप महत्त्वाचे आहेत, मात्र सध्या यावर व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटल्याने याचा वापर करता येत नाही. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन हे मार्ग रिकामे करावेत, अशी नागरिक अपेक्षा करीत आहेत.
चौकट
अपघात होण्याची शक्यता वाढली
येथील मुख्य चौकात खूप वर्दळ असते. औद्योगिक वसाहतीची वाहनेही याच चौकातून ये-जा करीत असतात. यामुळे येथे पादचाऱ्यांना नेहमी अपघाताचा धोका असतो. पादचारी मार्ग खुला झाल्यास हा धोका कमी होऊन अपघातही होणार नाही.
फोटो :