कऱ्हाड : पाचवड फाटा ते चांदोली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम उत्तम दर्जाचे चालू असून, वाहनांची गती वाढली आहे. अमर्याद वेगाने रोजच छोटे-मोठे अपघात घडत आहेत. यामुळे सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्याची गरज आहे.
कऱ्हाड-रत्नागिरी या राज्यमार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दोन वर्षांपासून हे काम सुरू असून, रस्ता रुंदीकरणाने वाहनांची वर्दळ वाढली आहे. कऱ्हाडहून रत्नागिरी येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याची ओळख आहे. या रस्त्याला कोठेही टोलनाका नसल्याने अवजड वाहनांसह दुचाकीस्वार, चारचाकी वाहनांची गर्दी वाढली आहे. रत्नागिरी, गणपतीपुळे, कोकण दर्शन पाहण्यासाठी पर्यटक या रस्त्याचा वापर करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची ये-जा वाढली आहे. रस्त्याचे काम चकाचक झाले असून, वाहनधारक सुसाट धावू लागले आहेत.
पाचवड फाटा येथून येणपेपर्यंत रस्त्यालगत अनेक मोठी गावे आहेत. पाचवड फाटा, धोंडेवाडी, ओंड, उंडाळे, नांदगाव, घोगाव, टाळगाव आदी गावांत मोठी बाजारपेठ आहे. नागरिकांच्या रोजच वापरातील रस्ता असल्याने दुचाकीसह तरुणाई वेगाने वाहन चालवत आहेत. याचा फटका अनेकांना बसत आहे. रोजच छोटे-मोठे अपघात घडत आहेत. अनेक जण जखमी होत आहेत तर अनेकांना आपला हातपाय गमवावा लागत आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रोजच अपघाताची मालिका या रस्त्यावर पाहावयास मिळत आहे. अपघाताची चर्चा गावोगावी होताना दिसत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
काही दिवसांपूर्वी भैरवनाथ नगर परिसरात रुग्णवाहिकाचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याकडील शेतात जाऊन पलटी झाली होती. तर अनेक ठिकाणी वाहनांची मोडतोड झाल्याची घटना घडल्या आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्याची गरज असून, अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. तर दुचाकी वाहने सुसाट वेगाने चालवून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या दुचाकीस्वारांच्या गाडीला ब्रेक लावून त्यांना जास्तीत जास्त दंड आकारून त्यांना चाप लावावा, अशी मागणी जोर धरत आहे.
(कोट)
या रस्त्यावर दुचाकीस्वार सुसाट गाडी चालवताना दिसत आहेत. रोजच अपघाताची मालिका सुरू आहे. अशा वाहनांची गती कमी होण्याची गरज आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे व अशा सुसाट वाहनांवर कारवाई करण्यात यावी.
-संतोष पाटील, नागरिक, भैरवनाथ नगर.