शिरवळ : ‘जिल्हा प्रशासन कोरोनाशी लढत असताना काही तथाकथित नेत्यांच्या वरदहस्ताने शिरवळ-नायगाव रोडवरील पंढरपूर फाटा याठिकाणी बेकायदेशीररित्या भाजी मंडई जोमात सुरू आहे. यामुळे कोरोनाला निमंत्रण मिळत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी भाजी मंडईसह बाजारावर बंदी घातली आहे. तरीही पंढरपूर फाट्यावरील भाजी मंडई भरत आहे. यामुळे संबंधित भाजी विक्रेत्यांकडून कोरोनाला निमंत्रण मिळत आहे. मात्र प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप शिरवळ ग्रामस्थांकडून होत आहे.
कोरोना रोगाच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दैनंदिन भाजी विक्री केंद्रावर बंदी घालत घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे आदेशाची मुदत शनिवार दि. १५ पर्यंत आहे.
दरम्यान, असे असतानाही शिरवळ येथील ग्रामस्थांकडून होणारी गर्दी पाहता पंढरपूर फाटा याठिकाणी असणारी बेकायदेशीर भाजी मंडई बंद करण्याची मागणी प्रांताधिकारी संगिता चौगुले-राजापूरकर यांच्यासह प्रशासनाकडे केली आहे. तरीही वारंवार याठिकाणी व्यापाऱ्यांसहित काही लोकप्रतिनीधीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित भाजी मंडई सुरू ठेवत आहेत. या भाजी मंडईला वरदहस्त नेमका कोणाचा आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
खंडाळा तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण जीवाच्या आकांताने दाहिदिशा भटकत असताना भाजी मंडईकरीता होणारी गर्दी पाहता एकप्रकारे कोरोनाला निमंत्रणच भाजी विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांकडून दिले जात आहे.
त्यामुळे वारंवार भरणारी बेकायदेशीर भाजी मंडई प्रशासनाला कशी दिसत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फोटो १०शिरवळ-मार्केट
शिरवळ-नायगाव मार्गावरील पंढरपूर फाटा येथे भाजीमंडई जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश भंग करून भरवली जात आहे. यामुळे कोरोनाला निमंत्रण मिळत आहे. (छाया : मुराद पटेल)