अंगापूर : अंगापूर वंदन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा सुजीत कणसे तर उपसरपंचपदी हणमंत बंडू कणसे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडी बिनविरोध झाल्या. या निवडीच्या घोषणा होताच समर्थकांनी व ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
अंगापूर वंदन ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक एवार्जीनाथ ग्रामविकास पॅनल व एवार्जीनाथ महाविकास आघाडी पॅनल या दोन पॅनलमध्ये निवडणूक पार पडली होती. ही निवडणूक एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत राहिली होती. या निवडणुकीत एवार्जीनाथ ग्रामविकास पॅनलचे सर्वच्या सर्व ११ उमेदवार विजयी झाल्याने विरोधी पॅनलला पराभव स्वीकारावा लागला.
या घवघवीत यशामुळे सरपंच व उपसरपंच कोण, अशा चर्चांना उधाण आले होते. सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे.
या पॅनलच्या चार महिला सर्वसाधारण गटातून विजयी झाल्या असल्याने सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार ही उत्सुकता लागून राहिली होती. सरपंचपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने उपसरपंचपदालाही महत्त्व आले होते. त्यामुळे सरपंच व उपसरपंच निवडीला महत्त्व प्राप्त झाले होते.
सरपंच व उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय सपाटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी आत्माराम पवार, गाव कामगार तलाठी एस. पी. माने तसेच नवनिर्वाचित सदस्य हणमंत कणसे, वर्षा कणसे, सुमन भुजबळ, वैशाली जाधव, हणमंत सुतार, विश्वनाथ कणसे, नीलम कणसे, प्रियांका निकम, नवनाथ गायकवाड, मच्छिंद्रनाथ नलवडे, हेमलता भुजबळ आदी उपस्थित होते.
सरपंचपदासाठी वर्षा कणसे तर उपसरपंचपदासाठी हणमंत बंडू कणसे यांचे पदनिहाय एकमेव अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली. या निवडीची घोषणा जाहीर होताच समर्थकांनी व ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
०८वर्षा कणसे
०८हणमंत कणसे