वडूज : तालुक्यातील तीन ग्रामीण रुग्णालये व सात प्राथमिक आरोग्य केंद्रांचा भलामोठा पसारा असलेल्या तालुक्यातील आरोग्यसेवा कागदावर मोठी असली तरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वडूज ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर वगळता प्रत्यक्षात सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे वडूज ग्रामीण रुग्णालयालाच उपचाराची गरज असल्याचे मत खटाव तालुक्यातील सोशिक जनतेमधून उमटत आहे.
वडूज ग्रामीण रुग्णालयाचा कार्यभार हाकणारे वैद्यकीय अधीक्षक सर्वात मोठे पद असून, अकार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची जुनी ओळख आहे. येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये अनेक वर्षांपासून तीन एमबीबीएस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मसिस्ट, कार्यालयीन अधीक्षक, क्लार्क, दोन शिपाई, तीन सफाई कामगार अशी रिक्त पदे असताना तीस बेडचे कोविड सेंटर डाॅ. सम्राट भादुले, डाॅ. अनिकेत पवार, डाॅ. स्नेहा झनकर आणि डाॅ. स्वप्नजा देशपांडे चालवत आहेत.
डिस्कळ, पुसेगाव, पुसेसावळी, कातरखटाव, निमसोड, मायणी व खटाव या सात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर नियंत्रण ठेवणारे तालुका वैद्यकीय अधिकारी युनूस शेख यांची देखरेख असल्याने याठिकाणी दैनंदिन तपासणी व लसीकरण मोहीम सुरू आहे, तर वडूज, कलेढोण आणि औंध ग्रामीण रुग्णालयावर कोणाचाच अंकुश नसल्याने सध्या येथील आरोग्य यंत्रणेवरच उपचार होणे काळाची गरज बनली आहे. या तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी तब्बल ३ ग्रामीण रुग्णालये, सात प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, तर औंध आणि वडूज येथे कोविड सेंटर आहे. पुसेगाव व खटाव येथे विलगीकरण कक्ष उभारले आहे. मात्र, यातील बहुतांश ठिकाणी एक ना अनेक समस्या डोके वर काढून असल्याने या यंत्रणेवर प्रथम प्राथमिक उपचार होणे गरजेचे आहे. तरच खटाव तालुकावासीयांना सार्वजनिक आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे.
वडूज येथील ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदनशील म्हणून रुग्णालय ओळखले जाते. तालुक्यातील लहान-मोठ्या घातपातापासून तर अपघातांतील रुग्णांसह तालुक्यातील दैनंदिन ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी तत्पर सेवा मिळणे गरजेचे आहे. अशाही स्थितीत या ठिकाणी प्रमुख पदे रिक्त आहेत. अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर या ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. सफाई कामगार नसल्याने स्वच्छतेचा मोठा प्रश्न याठिकाणी निर्माण होत असतो. वडूज ग्रामीण रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम होऊन बरेच वर्षे झाले आहे. ग्रामीण रुग्णालयालगत असलेल्या इमारतीमध्ये नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे तीस बेडचे कोविड सेंटर सुरू आहे.
वडूज ग्रामीण रुग्णालयात कोरोना तपासणी करण्यासाठी सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ सध्या काम पाहत आहेत, तर या तपासण्यासाठी उपलब्ध साठाच नसेल तर येथील अकार्यक्षम अधिकारीच जबाबदार असल्याचे निष्पन्न होते. कारण कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर ठिकाणी साठा व लसीकरण मोहीम सुरू असते. वडूज शहरातील मुख्यालयातच बोजवारा उडतो, ही बाब खेदजनक आहे. परिणामी सक्षम लोकप्रतिनिधींचा दरारा नसल्याने सारा कारभार रामभरोसे सुरू आहे.
चौकट..
तालुकावासीयांना न्याय देणार का?
वडूज शहरासह तालुक्यातील घातपात व अपघातांचा सारासार विचार करून हे रुग्णालय पूर्ण झालेले असून, अद्ययावत मशिनरी दाखल झालेली आहे. मात्र, या ठिकाणी अस्तित्वात असलेली पदे पूर्णत: रिक्त असून येथील साहेबांचा तोराच काही और आहे, याचा दगाफटकाही काहीवेळा त्यांना बसला आहे. यामुळेच शहरातील आरोग्य यंत्रणा म्हणजेच ‘आई जेऊ घालेना व बाप भीक मागू देईना’ अशी झालेली आहे. वडूज शहरातील ग्रामीण रुग्णालयात ओपीडीची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. साथींच्या आजारांच्या सुमारास यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते. आतातरी या गंभीर विषयावर सिव्हिल सर्जन लक्ष घालून वडूजकरांसह तालुकावासीयांना न्याय देणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
...................फोटो आहे...