सातारा : महिती तंत्रज्ञानाच्या युगात व्हॉटस अप, फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल मीडियाचा वापर सर्रास केला जात आहे. मात्र अशा मीडियावर धार्मिक भावना भडकावण्याचे, सामाजिक शांतता बिघडवण्याचे प्रकारही सातत्याने घडत असल्याने तो चिंंतेचा विषय बनला आहे. सातारा शहराला शांतता आणि सामाजिक बंधुत्वाची मोठी परंपरा आहे. सातारकरांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावा आणि शहराची ही ओळख जपावी, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सध्या प्रत्येकाच्या हातात आधुनिक मोबाइल असून, व्हॉटस अप, फेसबुकसारख्या सोशल मीडियात प्रत्येकजण मग्न झाला आहे. मात्र काही समाजकंटकङ्कआक्षेपार्ह मजकूर या मीडियावर टाकून तेढ निर्माण करतात. त्यामुळे सामाजिक शांततेला बाधा पोहोचते.सोशल मीडियावर आक्षेपार्ह छायाचित्रे आणि मजकूर टाकल्याने शांतता बिघडून अनुचित प्रकार घडतात, हे आपण काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. मुळात असे घडू नये यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे. सामाजिक शांतता ही प्रशासनाची जबाबदारी आहे, तशीच ती आपलीही आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवावी.सध्या सणासुदीचे दिवस असून राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत भावना भडकावून समाजात अनुचित प्रकार घडेल, या उद्देशाने समाजकंटक असे प्रकार करतात, हे सर्वांना ज्ञात असणे गरजेचे आहे.असे मजकूर आणि छायाचित्रे प्रसिध्द झाल्यास सुज्ञ नागरिक आणि युुवकांनी त्याला महत्त्व न देता, अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. तरच सामाजिक शांतता आणि जातीय सलोखा अबाधित राहील, असे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
सोशल मीडिया जपून वापरा
By admin | Updated: July 23, 2014 22:31 IST