सातारा : येथील मोळाचा ओढा ते लिंब खिंडीदरम्यानच्या रस्त्याचे पुढे काम सुरू असताना मागे रस्ता उखडू लागला आहे. हे काम करताना डांबर ऐवजी जळक्या डिझेलचा वापर करून रस्ता तयार केला आहे, असा आरोप करत नव्याने रस्ता करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा वर्येचे माजी सरपंच विशाल ननावरे यांनी दिला.
वर्ये येथील एका शाळेसमोर केलेल्या रस्त्याचे काम पाच दिवसात उखडल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. काम दिलेल्या ठेकेदाराने डांबर नाही तर जळक्या ऑईलचा वापर करून रस्ता केल्याचे अनेक जण सांगतात. उघडलेल्या रस्त्यावर दोन दिवसात काही जण घसरल्याने भविष्यात अपघात होऊ शकतात. निविदेप्रमाणे या रस्त्याच्या कामाचे काम आणि गुणवत्ता बांधकाम विभागाने तपासणी करण्याची मागणी वर्ये ग्रामस्थांनी केली आहे. सदर रस्त्याचे काम पुन्हा केले जावे, अन्यथा आंदोलन करणार असल्याचे राजू तपासे, तानाजी ननावरे, हणमंत जगताप यांनी सांगितले. यावेळी सौरभ ननावरे, कमलाकर साबळे, विजय ननावरे, रमेश ननावरे, सुनील ननावरे, विजय ननावरे आदी ग्रामस्थांनी उखडलेल्या रस्त्यावर फुलं वाहून बांधकाम विभाग आणि ठेकेदाराचा निषेध व्यक्त केला.
फोटो ओळ : मोळाचाओढा ते लिंब खिंड या रस्त्यावरील काम निकृष्ट असल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले.