भातावरुन शिताची परिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपर्डे हवेली : कोरोनाच्या अनुषंगाने कोविडची चाचणी करण्यासाठी काही ग्रामस्थ तयार होत नसल्याने रेशन दुकानदार, आरोग्य विभाग, तलाठी, ग्रामपंचायत, कोरोना योद्धे यांच्या संकल्पनेतून रेशनकार्डधारकांच्या घरातील एका व्यक्तीची कोविड रॅपिड चाचणी करावी अन्यथा रेशन मिळणार नाही, असा कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथे अलिखित नियम करुन चाचणी केली जात असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चाचणी करण्याची संख्या मर्यादित होती. त्यासाठी आरोग्य विभाग, गावातील रेशन दुकानदार, तलाठी, ग्रामपंचायत यांनी ज्यांचे रेशनकार्ड आहे, त्यांनी घरातील एका व्यक्तीची कोरोनाची चाचणी केली पाहिजे अन्यथा रेशन मिळणार नाही, असा अलिखित नियम तयार केला. शासनाचा नियम नसताना रेशन दुकानदार दादासो चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जपत तलाठी, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत कोरोना योद्धे यांच्या सहकार्यातून ही मोहीम दोन दिवसांपासून राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे. एखाद्या घरात व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आल्यास संपूर्ण कुटुंबाची चाचणी केली जात आहे.
ही मोहीम राबवताना सोशल मीडियावरून त्याचा प्रसार करण्यात आला. त्याला ग्रामस्थ प्रतिसाद देत असून, कोरोना चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामध्ये कोपर्डे हवेली उपकेंद्राचे डॉ. अमित जाधव, आरोग्यसेवक संदीप जाधव, आरोग्यसेविका देशपांडे, तलाठी संजय सावंत, रेशन दुकानदार दादासो चव्हाण, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, कोरोना योद्धे, आदींचा सहभाग आहे.
कोट :
ही मोहीम गावाच्या भल्याकरिता राबविण्यात येत आहे. त्यामुळे चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भातावरून शिताची परीक्षा हाच या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत अनेकांचा सहभाग असून, गावातील प्रत्येक घटक यामध्ये सामील झाला आहे. गावातील घरटी एकाची कोरोनाची चाचणी करायची झाल्यास सुमारे तेराशे ते चौदाशे चाचण्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढणार असून, पुढील उपाययोजना करता येतील. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कोरोना रोखण्यात यश मिळेल.
दादासो चव्हाण, रेशनिंग दुकानदार, कोपर्डे हवेली.
चाैकट :
सोमवार.... १०० टेस्ट... १ पाॅझिटिव्ह
मंगळवार... ५०.... एकही नाही
बुधवार...१०० टेस्ट १ पाॅझिटिव्ह
फोटो ओळ... कोपर्डे हवेली येथील आरोग्य उपकेंद्रावर ग्रामस्थ कोरोना चाचणी करून घेत आहेत.