कुडाळ : जावळी तालुक्यातील रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, भुईमूग ही पिके घेतली जातात. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने रब्बीची पिके वाया जाऊन उत्पादन कमी होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात यावर्षी दमदार पाऊस झाला आहे. यामुळे रब्बी हंगामात पिकांना पोषक वातावरण मिळाल्याने ज्वारी, हरभरा, गहू, आदी पिकांची जोमाने वाढ झाली आहे. मात्र, ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. गेले दोन दिवसांपासून परिसरातील वातावरणात बदल झालेला आहे. वातावरणातील गारठा कमी झाला असून, ढगाळ वातावरणामुळे गव्हावर तांबेरा रोग पडल्याचे दिसत आहे. ज्वारीच्या पानांवर चिकटा, मवा कीड पडली असून, हरभऱ्यावर घाट पडण्याची शक्यता आहे. या प्रतिकूल वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर परिणाम होणार असून, उत्पादनात घट होईल, असे शेतकत्यांनी सांगितले.
(कोट)
शेती हा व्यवसाय पूर्णतः निसर्गावरच अवलंबून आहे. यावर्षी मोसमी पावसाने साथ दिल्याने रब्बीच्या हंगामातील पिके चांगली आहेत. अशातच बदलत्या वातावरणामुळे गहू, ज्वारी, हरभरा या पिकांवर रोग पडला असून, अवकाळी पावसाचाही पिकांना फटका बसणार आहे. याचा उत्पादनावर परिणाम होईल.
- संजय ननावरे, शेतकरी
........................................
सकाळी सूर्याचे दर्शन नाही
कुडाळ : वातावरणातील बदलामुळे कुडाळ परिसरात दोन-तीन दिवसांपासून सकाळी सूर्यदर्शन घडतच नाही. आठ, नऊ वाजेपर्यंत संपूर्णतः ढगाळ छाया असते. पहाटेच्या वेळी धुक्याची झालर सगळीकडे पाहायला मिळत आहे. यामुळे ढगाआड लपलेला सूर्य मात्र काही दिसतच नाही.