सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या लाल परी चालक फलाटावर शिस्तीत गाड्या लावतात. मात्र शेवटचा थांबा सातारा असणारे चालक प्रवाशांना उतरण्यासाठी रस्त्यातच गाडी उभी करतात. त्यामुळे फलाटावरून मार्गस्थ होणाऱ्या गाड्या मागे घेताना अडचण निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात राज्यातील विविध आगारांतून साताऱ्यासाठी फेऱ्या सुरू असतात. बसस्थानकाचे प्रवेशाचे व बाहेर जाण्याचे गेट काही महिन्यांपूर्वी बदलले आहेत. पूर्वी सेव्हन स्टारजवळील गेटमधून आलेल्या गाड्या थेट आगाराच्या दारात जाऊन थांबत असत. त्यामुळे वाहनांची कोंडी होत नसायची. आता मात्र जंबो कोरोना सेंटरजवळील गेटमधून गाड्या आत जातात. पुढील प्रवासाला जाणाऱ्या गाड्या फलाटावर जाऊन थांबतात. मात्र ज्यांचा सातारा हा शेवटचा थांबा असतो. अशा गाड्या इतर विभागातून आलेल्या पुणे, मुंबई गाड्या थांबतात तेथे येऊन थांबतात. चालक नोंद करण्यासाठी नियंत्रण कक्षेत जातात. त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी होत असते.
कोट
पूर्वी जुन्या गेटमधून गाड्या आत येऊन थांबत, तेव्हा गाडीतून उतरल्याबरोबरच रिक्षा मिळत असायचे. तसेच शेजारीच एसटीडी सेंटर असल्याने नातेवाईक नेण्यासाठी येईपर्यंत आतमध्ये थांबता येत होते. आता या ठिकाणी गाडीतून उतरले, तर इतर गाड्यांचा वेढा पडलेला असतो. त्यामुळे सगळा गोंधळ वाढतो.
- मच्छिंद्र माने, सातारा.
कोट
मराठवाडा तसेच पुणे, मुंबईचे आई-वडील साताऱ्यात आले, तर त्यांच्याकडे मोबाईल नसतो. अशावेळी गाडीतून उतरल्याबरोबर एसटीडीत जाऊन, आपण आलो असल्याबाबत फोन करता येत होता. आम्हीही लगेच त्यांना आणायला इतर वाहन घेऊन जात होतो. आता थांबण्यासाठी सोय नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत असतात.
- सागर पंडित, सातारा.
चौकट
जुन्या पद्धतीने गेट सुरू करावे
सातारा मध्यवर्ती बसस्थानकाचे प्रवेशद्वार व बाहेर जाण्याचा मार्ग पूर्वीप्रमाणे केल्यास बाहेरून आलेल्या गाड्या थेट आगाराच्या दारापर्यंत जाऊन थांबू शकतात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना जागा उपलब्ध होऊ शकते. साहजिकच बसस्थानकासमोरील रस्त्यावर एसटीच्या रांगा लागणार नाहीत.
फोटो ओळ
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात बाहेरगावाहून शेवटचा थांबा घेऊन येणाऱ्या गाड्या रस्त्यातच थांबत असल्याने वाहनांची कोंडी होत असते. (छाया : जावेद खान)