लोणंद : विनापरवाना दारूविक्री करणारी टोळी व्हॅनसह लोणंद पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यांच्याकडून २ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.
लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व वाईन शॉप, बार बंद असल्याचा फायदा घेऊन अहिरे (ता. खंडाळा) येथील विनापरवाना दारूविक्री करणारी टोळी व्हॅनमधून लोणंद हद्दीत चोरट्या दारूची वाहतूक करणार असल्याची तसेच पाडळी येथे दोन ठिकाणी अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लोणंद पोलिसांनी दोन पथके तयार करून टोळीला पकडण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार लोणंद पोलिसांच्या एका पथकाने कराडवाडी येथील लोणंद ते शिरवळ जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करुन गाडीची तपासणी केली असता, गाडीतील तिघांकडून नऊ हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या, साठ हजार रुपये किमतीची कार, रोख रक्कम २५ हजार सातशे रुपये तसेच १ लाख ४० हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन असा एकूण २ लाख ३४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तसेच लोणंद पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने पाडळी येथे विनापरवाना दारूविक्री करणाऱ्या दोन अड्ड्यांवर छापा टाकून पंधरा हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करून दारू वाहतूक व विक्री करणाऱ्या अश्फाक जाकीर काझी, हेमंत रामदास चव्हाण, अक्षय धायगुडे (रा. अहिरे), सतीश वसंत बोडरे, किसन हनुमंत खुडे (रा. पाडळी) या पाचजणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमध्ये लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार भगवान पवार, दत्ता दिघे, संतोष नाळे, ज्ञानेश्वर मुळीक, विठ्ठल काळे, श्रीनाथ कदम, अभि शिंदे, अभिजीत घनवट, दत्ता वाघमोडे, सागर धेंडे यांनी सहभाग घेतला.