रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील पंपहाऊसच्या पाणीसाठ्यात सुमारे ४५ वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला आहे.
याबाबत रहिमतपूर पोलीस ठाण्यात पोलीसपाटील रवींद्र भोसले यांनी फिर्याद दिली. वाठार किरोली येथील पंपहाऊसमध्ये येणाऱ्या आरफळ कालव्यातील पाण्यातून अनोळखी पुरुषाचा मृतदेह वाहून आला असल्याची माहिती टकले गावचे पोलीसपाटील दत्तात्रय घाडगे यांनी फोनवरून दिली. दरम्यान, पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यास अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. पंपहाऊस येथील पाणीसाठ्याची पाहणी केली असता पुरुषाचा मृतदेह सापडला. मृताच्या अंगावर पिवळ्या रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची पँट आहे. त्याच्या डाव्या हाताच्या आतील बाजूला पोटरीवर इंग्रजीमध्ये रिना असे लिहिलेले आहे. या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सावंत करत आहेत.