सातारा : सातारा पालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून सोमवारी पुन्हा एकदा बसाप्पा पेठेत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. रस्त्याकडेला थाटण्यात आलेल्या येथील सर्व टपऱ्या पालिकेच्या पथकाकडून हटविण्यात आल्या.
सातारा शहरातील अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. शहरातील प्रमुुख चौक, रस्ते तसेच गल्लीबोळातही टपऱ्या व हातगाड्यांचे साम्राज्य वाढू लागले आहे. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बसाप्पा पेठेतही रस्त्याकडेला टपऱ्यांची रांग लागली आहे. याबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत पालिकेच्या अतिक्रमण पथकाने शुक्रवारी बसाप्पा पेठेतील काही टपऱ्या पोलीस बंदोबस्तात हटविल्या. मात्र, राजकीय दबावामुळे ही कारवाई काही वेळातच थांबवावी लागली.
दरम्यान, सोमवारी पुन्हा एकदा अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या पथकाने धडक कारवाई करत बसाप्पा पेठेच्या सेनॉर चौकातील तब्बल सहा बंद टपऱ्या जेसीबीच्या साह्याने हटविल्या. गटई खोक्याचा अपवाद वगळता बंद टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्यात आल्याने बसाप्पा पेठेतून करंजेत जाणाऱ्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. टपरीधारकांनी आधी काही काळ वाद घालण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रशासनाच्या परखड भूमिकेमुळे नंतर त्यांचा विरोध मावळला. या कारवाईत सर्व टपऱ्या पालिकेने जप्त केल्या.
फोटो : ०८ पालिका अतिक्रमण
सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी बसाप्पा पेठेसील सहा बंद टपऱ्या जप्त केल्या.