उंब्रज : येथे सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथील सोमवारचा आठवडी बाजार बंद करण्यात आला असल्याची माहिती उंब्रजचे ग्रामस्तरीय कोरोना समितीचे अध्यक्ष व सरपंच योगराज जाधव यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करणेकामी सातारा जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार व व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे ग्रामस्तरीय समितीला दिलेल्या सूचनांप्रमाणे हा निर्णय ग्रामस्तरीय कोरोना समितीचे सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच उंब्रज ग्रामपंचायत कार्यक्षेत्र अंतर्गत सर्व व्यापारी, हॉटेल चालक, पिग्मीएजंट यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्यावी, ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांनी व व्यापारी लोकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे. तसेच सर्वांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. दुकानामध्ये पाचपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देऊ नये आणि दुकानात सुरक्षित अंतर ठेवण्यात यावे. स्थानिक शेतकरी यांनी सामाजिक अंतर ठेवून बाजारपेठेत शेतमाल विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.