सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास पॅनेलविरोधात खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी सोमवारी परिवर्तन पॅनेलची घोषणा केली. चिन्ह वाटपावेळी परिवर्तन पॅनेलच्या सात उमेदवारांची यादी दिनकर शिंदे (वाई) यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. तसेच आमदार जयकुमार गोरे, आमदार बाळासाहेब पाटील, प्रभाकर साबळे व धनाजी पाटील या चौघांंचे चिन्ह वेगळे असले तरी तेही या पॅनेलसोबतच असल्याचा दावाही केला.दरम्यान, बँकेचे माजी अध्यक्ष विलासराव पाटील-उंडाळकर, बकाजीराव पाटील, माजी संचालक लालासाहेब शिंदे यांच्यासह सात उमेदवारांनी स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीने उदयनराजेंना आपल्या पॅनेलमध्ये घेऊन बिनविरोध निवडून आणले असले तरीही उदयनराजे समर्थकांचा रोष राष्ट्रवादीला थोपवता आलेला नाही. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलमध्ये स्वत: दिनकर शिंदे (वाई), तुकाराम शिंदे (फलटण), सुरेश गायकवाड (कोरेगाव), बाळासाहेब शिरसट (अनु. जाती, कऱ्हाड), अजय धायगुडे-पाटील (खंडाळा), शिवाजी भोसले (इतर मागास, सातारा) व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार (जावळी) यांचा अधिकृत समावेश आहे. यापैकी बहुतांश मंडळी उदयनराजेंना मानणारी आहेत. उदयनराजेंच्या बिनविरोध निवडीमुळे विरोधकांचे आव्हान संपुष्टात येईल, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरवत विरोधकांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. (संबंधित वृत्त ३ वर)आमदार जयकुमार गोरे, आमदार बाळासाहेब पाटील, प्रभाकर साबळे व धनाजी पाटील यांची निवडणूक चिन्हे वेगळी असली तरीसुद्धा हे चौघेही परिवर्तन पॅनेलसोबत काम करणार आहेत.- अजय धायगुडे-पाटील
राष्ट्रवादीच्या विरोधात ‘उदयनराजे समर्थक’ एकवटले !
By admin | Updated: April 28, 2015 00:20 IST