कऱ्हाड : अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर राजकारणात पुन्हा सक्रिय होत आहेत. रयत संघटनेच्या कऱ्हाड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची कऱ्हाड येथे बैठक होऊन त्यामध्ये उदय पाटील यांच्या राजकीय एन्ट्रीचा मुहूर्त ठरविण्यात आला. त्यासाठी मलकापूरची निवड केली असून २१ मे रोजी स्वागत मेळावा होणार आहे. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचा वारसा गेल्या दहा वर्षापासून अॅड. उदयसिंह पाटील चालवत होते. गत विधानसभा निवडणुकीला अॅड. उदयसिंंह पाटीलच दावेदार होते. मात्र, मध्यंतरीच्या कालावधीत ते कायद्याच्या चौकटीत अडकले. अशातच त्यांची निर्दोष मुक्तता झाली. उदय पाटील-उंडाळकर हे स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकरांचे नातू. वडील, चुलते यांचा राजकीय, सामाजिक सेवेचा अनेक वर्षांचा वारसा, स्वातंत्र्यपूर्व काळापासून उंडाळकर कुटुंबांचे सामाजिक योगदान पाहता त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तिने तालुक्याचे राजकारण करावे, अशीच सर्वसामान्यांची भावना असल्याने गेले सहा महिने उदयसिंंह पाटील यांची राजकीय एन्ट्री केव्हा होणार, याबाबत तालुक्यात उत्सुकता होती. यात युवा वर्ग अग्रभागी होता. बैठकीला माजी सभापती एम. जी. थोरात,संचालक हिंंदुराव चव्हाण, बबनराव साळुंखे, पैलवान जगन्नाथराव मोहिते, उपसभापती विठ्ठलराव जाधव, अॅड. अमृतराव पवार, निवासराव पाटील, माजी सभापती प्रदीप पाटील, प्रा. धनाजी काटकर, मोहनराव माने, सुहास कदम, कोयना दुध संघाचे अध्यक्ष संपतराव इंगवले, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष हणमंतराव चव्हाण, उपाध्यक्ष महेशकुमार जाधव, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, उपाध्यक्ष विजय मुठेकर, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. महेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती१९६७ पासून उंडाळकरांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या रयत संघटनेची कऱ्हाड येथे बैठक झाली. त्यामध्ये २१ मे रोजी तालुक्यातील रयत संघटनेच्या ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचे निश्चित केले. या मेळाव्यात अॅड. उदयसिंंह पाटील यांची राजकीय पटलावर एन्ट्री होणार आहे. कृष्णा सहकारी साखर कारखाना, कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा मेळावा महत्वपूर्ण ठरणार आहे.
उदयसिंह पाटलांची उद्या राजकीय एन्ट्री
By admin | Updated: May 19, 2015 22:45 IST