कऱ्हाड : ‘काळा पैसा परत आणणार, भ्रष्टाचार रोखणार असे सांगून नरेंद्र्र मोदी देशातील जनतेची फसवणूक करत आहेत. असाच कऱ्हाड दक्षिणमध्ये आपल्यातील एक मोदी गेली ३५ वर्षे कुठे जनाधार तरी कुठे धनदांडगे अशी भाषणे सांगत लोकांना फसवत होता,’ अशी मिश्कील टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यावर नाव न घेता केली. गोळेश्वर, ता. कऱ्हाड येथे विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. मदनराव मोहिते अध्यक्षस्थानी होते. आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, सदस्या विद्याताई थोरवडे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, शहर अध्यक्ष प्रदीप जाधव, इंद्रजित चव्हाण, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता बी. के. वानखेडे, जिल्हा परिषदचे उपअभियंता बी. व्ही. साखरे, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, नानासाहेब थोरात, मोहनराव शिंगाडे, आनंदराव सुतार, सरपंच मनीषा जाधव, उपसरपंच प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘वडिलांच्या पुण्याईने मिळालेली आमदारकी सभागृहात पाजळायची सोडून नरेंद्र्र पाटील आमच्या मतदारसंघात येऊन का बरं धडपडत आहेत. उंडाळकरांना प्रेमलाकाकींनी उमेदवारी दिली. ते कधी कुणाशी प्रामाणिक राहिलेले नाहीत. तर कधीच ते काँग्रेसशी प्रामाणिक नव्हते.’यावेळी जयवंतराव जगताप, मनोहर शिंदे, विद्याताई थोरवडे यांची भाषणे झाली. सरपंच मनीषा जाधव व उपसरपंच प्रदीप जाधव तसेच सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. दौलतराव इंगवले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) अतुलबाबांना लाल दिव्याचा शौक पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी अतुलबाबा त्यांच्या गाडीत बसायचे. अतुलबाबांनी केवळ गप्पा मारल्या; पण त्यांच्या गावची व विभागातील विकासकामे सुचवली नाहीत. कदाचित त्यांना लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचा शौक असावा, त्यामुळे ते पृथ्वीराज बाबांच्या गाडीत होते, असा टोला विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप यांनी लगावला.
उंडाळकर म्हणजे दक्षिणेतले मोदी : पृथ्वीराज चव्हाण
By admin | Updated: June 10, 2016 00:19 IST