उंब्रज : जुनी भांडणे मिटविण्याच्या कारणावरून दुटाळवाडी, ता. पाटण येथील दोन युवकांचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी कालगाव, ता. कऱ्हाड येथील सोमनाथ चव्हाण व त्याच्या अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद अपहरणकर्त्या युवकाच्या वडिलांनी उंब्रज पोलिस ठाण्यात दिली आहे. वैभव लहू चव्हाण (वय २२, रा. दुटाळवाडी) व निसार मेहबुब मुलाणी इनामदार (वय २०, रा. कार्वेनाका कऱ्हाड) असे अपहरण झालेल्या युवकांची नावे आहेत. याबाबत लहू शंकर चव्हाण (वय ६५) यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीनुसार कालगाव येथील सोमनाथ चव्हाण हा फिर्यादीच्या घरी ४ जून रोजी गेला होता. त्यावेळी सोमनाथ याने फिर्यादीस ‘दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाची केस मिटवून घेऊया. त्यामध्ये झालेला खर्च मी देतो,’ असे सांगितले. त्यावर फिर्यादीने ‘अधी खर्च दे मग केस मागे घेऊ,’ असे म्हटले असता सोमनाथ याने फिर्यादीचा मुलगा वैभवचा मोबाईल क्रमांक मागितला व त्यास ‘उचलून नेतो,’ असे धमकाविले. त्यानंतर दि. ६ जून रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास वैभव व त्याचा मित्र निसार हे घरी असताना सोमनाथ चव्हाण व त्याचे अन्य साथीदार लाल रंगाच्या (एमएच ११ बीवाय ३६०१) या कारमधून फिर्यादी चव्हाण यांच्या घरासमोर आले. त्यांनी वैभव व निसार यांना कारमध्ये घालून नेले. (प्रतिनिधी)
दुटाळवाडीतून दोन युवकांचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2016 00:35 IST