सातारा : कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल स्वस्त झाल्याने दुचाकी हसली तर डिझेलच्या दरात लिटरमागे ७० पैसे वाढ झाल्याने चारचाकीधारक रुसले आहेत.महागाईचा आलेख गेल्या काही दिवसांत वाढता-वाढता वाढे याप्रमाणे आहे. जीवनावश्यक प्रत्येक वस्तू वाढत असताना आज (शुक्रवारी) पेट्रोल स्वस्त झाल्याचा आनंद अनेक ग्राहकांनी व्यक्त केला. खूप दिवसांनी बाजारपेठेत ही बातमी आल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.मात्र, चारचाकीधारकांचा पुन्हा एकदा हिरमूस झाला आहे. गेल्या काही वर्षांत डिझेलच्या दरात तिप्पट-चौपट वाढ झाली आहे. चारचाकी गाड्यांचा मेन्टेनन्स आधीच जास्तीचा असतो. त्यात पुन्हा झालेली दरवाढ वाहनधारकांना चिंतेत टाकणारी आहे. पेट्रोल, डिझेलबरोबरच विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत अडीच रुपयांची कपात करण्यात आली आहे. या बातमीमुळे संयुक्त कुटुंबातील गृहिणी सुखावल्या आहेत. संंयुक्त कुटुंबात महिन्याला एक गॅस सिलिंडर पुरवला जातो. वाढत जाणाऱ्या महागाईवर कोणाचेच नियंत्रण नाही, अशी अवस्था झाली होती. पण, पेट्रोल आणि सिलिंडरच्या किमती कमी झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. भविष्यातही जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढ कमी करून नागरिकांच्या हिताचा विचार शासनाने करावा, अशी मागणी आहे.(प्रतिनिधी)
दुचाकी हसली..चारचाकी रूसली!
By admin | Updated: August 1, 2014 23:18 IST