शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजीनगर येथील विकी चव्हाण हा शिरवळ परिसरातील एका कंपनीत होता. शुक्रवारी (दि. २९) विकी चव्हाण हा कंपनीमध्ये दुसऱ्या पाळीमध्ये कामावर आला होता. काम संपल्यावर मध्यरात्री बाराच्या सुमारास विकी दुचाकी (एमएच ११ सीके १३७९) वरून घराकडे निघाला होता. दरम्यान, विकी चव्हाण हा शिरवळ गावच्या हद्दीमध्ये लॉकीम फाट्याजवळील महामार्ग ओलांडत असताना साताऱ्याहून पुण्याकडे निघालेल्या भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर (डीएन ०९ एन ९८१७) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की विकी चव्हाण घटनास्थळापासून कंटेनरसह १५ ते २० फूट फरफटत गेल्याने गंभीर जखमी झाला.
घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी विकीला शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी कंटेनर चालक बाबू अशोक पाटील (रा. भिवंडी, ठाणे) याला शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे.
महेश ढमाळ यांनी याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार धीरज यादव तपास करीत आहेत.