पाटण: पाटण (नेरळेगौंड) येथील एमआयडीसीनजीक पाटण-कोयना मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, सागर बबन मोहिते (हिंगणगाव, ता.कडेगाव, जि.सांगली) हे पत्नी पूजा (वय १९) यांना घेऊन दुचाकीवरून (एमएच १० सीडी ७७२५) येराड येथील श्री येडोबा देवाच्या दर्शनासाठी निघाले होते, तर सुनील कोंडिबा शेलार (वय ४०) व संदीप कोंडिबा शेलार (३२) हे दोघे मानाईनगर (ता.पाटण) येथून पाटणकडे येत होते.
कऱ्हाड-चिपळूण महामार्गावर पाटणपासून तीन किलोमीटर अंतरावर नेरळेगौंड परिसरातील एमआयडीसीनजीक शुक्रवार दि. १३ रोजी सकाळी १२ वाजण्याच्या या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये सुनील शेलार व संदीप शेलार, सागर मोहिते व पत्नी पूजा मोहिते या चार जणांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच, पाटण पोलीस स्टेशनचे फौजदार खांडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला. या अपघाताची नोंद पाटण पोलिसांत झाली असून, पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.