सातारा : जिल्ह्यात कोरोनाची आणि बळींची संख्या वाढतच आहे. गत चोवीस तासांत २९३ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये दोघांचा बळी गेला. यामुळे मृतांचा आकडा १८८९ वर पोहोचला आहे; तर बाधितांची संख्या ६२ हजार ८७५ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गत आठवड्यात तीनवेळा तीनशे पार रुग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे प्रशासन आणखीनच चिंतेत पडले आहे.
दरम्यान, मंगळवारी १५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र यामध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र दुसर्यादिवशी बुधवारी दोघांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची पुन्हा धाकधूक वाढली.
बुधवारी आलेला २९३ जणांच्या अहवालामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राजुरी (ता. फलटण) येथील ५५ वर्षीय पुरुष, तर कऱ्हाडमधील शुक्रवार पेठेतील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
गतवर्षी असलेले कोरोनाचे हॉटस्पॉट यावर्षीही कायम आहेत. सातारा आणि फलटण तालुक्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यांवर जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या ६२ हजार ८७५ इतकी झाली आहे, तर बळींचा आकडा १ हजार ८८९ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ५८ हजार ५८३ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या २ हजार ४०४ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.