कऱ्हाड : नांदगाव येथे कौटुंबिक वादातून चुलत्यासह दोन चुलतभावांवर युवकाने कुऱ्हाडीने हल्ला केला. रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शामराव कांबळे, पोपट शामराव कांबळे व अमोल शामराव कांबळे (तिघे, रा. नांदगाव) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी महेश भीमराव कांबळे याच्यावर कऱ्हाड पोलिसांत गुन्हा नोंद आहे. नांदगाव येथील पोपट कांबळे व त्याचा चुलतभाऊ महेश या दोघांची घरे शेजारीशेजारी आहेत. रविवारी रात्री पोपटची मुले त्यांच्या घरासमोरील अंगणात आंब्याच्या झाडाखाली खेळत होती. त्यावेळी महेश त्या ठिकाणी आला. त्याने त्या मुलांना ‘येथे खेळू नका,’ असे दरडावले. या कारणावरून पोपट व महेश यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. हा वाद सुरू असतानाच पोपटचे वडील शामराव तेथे आले. त्यांनी महेशला ‘तू मुलांना असे बोलू नकोस आणि वाद घालू नकोस,’ असे सुनावले. मात्र, त्याचा राग मनात धरून महेशने धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी घरात जाऊन तो कुऱ्हाड घेऊन आला. त्याने पोपट व त्याचे वडील शामराव यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. शामराव यांच्या छातीवर, तर पोपटच्या खांद्यावर गंभीर दुखापत झाली. पोपटचा भाऊ अमोल भांडणे सोडविण्यास आला. महेशने त्याच्यावरही कुऱ्हाडीने हल्ला केला. अमोलही गंभीर जखमी झाला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन भांडणे सोडविली. तसेच जखमी शामराव, पोपट व अमोल यांना खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले. पोपट कांबळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार महेश कांबळेवर कऱ्हाड तालुका पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. पोलीस हवालदार सतीश मयेकर तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
चुलत्यासह दोन भावांवर कुऱ्हाड हल्ला
By admin | Updated: May 5, 2015 00:49 IST