सातारा : शहरालगत असणाऱ्या वाढे फाटा येथून वेण्णा नदीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबलेल्या परप्रांतीय युवकाला चाकूचा धाक दाखवून त्याची दुचाकी चोरून नेली होती. ही घटना घडल्यानंतर काही तासांतच सातारा तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोपाल रामलाल भिल्ल (२१, सध्या रा. विठ्ठलनगर, खेड चौक, सातारा. मूळ रा. देवोघरी सुंदरचा, जि. उदयपूर, राजस्थान) हा युवक साताऱ्यातील एका दुकानात मजुरी करतो. सोमवार, दि. १५ रोजी तो सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून वाढे फाटा येथून वेण्णा नदीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने निघाला होता. रस्त्यात थांबून लघुशंका करत असतानाच तीन अनोळखी युवकांनी अडवले. धक्काबुक्की करून एकाने चाकू बाहेर काढत त्याच्यावर उगरला. पैसे दिले नाही तर मारून टाकेन, अशी धमकी दिली. यानंतर संबंधित युवकांनी त्याची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी गोपाल भिल्ल याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिघा अनोळखींवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून आठ तासांच्या आत दोघांना अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. विपुल तानाजी नलवडे (२३, रा. करंजे, सातारा), करण अमर भिसे (२०, रा. दत्त काॅलनी, म्हसवे रोड, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरणचे हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, नीलेश जाधव, सागर निकम, सतीश पवार, समाधान बर्गे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी करत आहेत.