शिरवळ : अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला होता. अपघातस्थळी केवळ टेम्पोचे कंटेनर बॉडी असलेले बंपर एवढाच पुरावा होता. सुतावरून स्वर्ग गाठत महामार्गावरील विविध ठिकाणचे तब्बल २७ सीसीटीव्ही कॅमेरे तपासत अवघ्या आठ तासांत अपघातातील टेम्पोचालकाच्या मुसक्या शिरवळ पोलिसांनी आवळल्या. दिनेश भगेलू विश्वकर्मा (वय ४०, रा. प्रतापगंज, उत्तरप्रदेश सध्या रा. कलवा, ठाणे) असे अटक केलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कडलगे खुर्द, ता. चंदगड, जि. कोल्हापूर येथील अनंत तानाजी पाटील (वय ३५) हे मित्रांसमवेत मुंबई याठिकाणी लेंथ मशीन टेस्टिंगकरिता कार (केए ५१ एमबी ३८३४) मधून मित्र ज्ञानेश्वर कृष्णा तुडवेकर (३०), तानाजी नागोजी पाटील (६६), सचिन तुपट (३५), चालक संजय पुंडलिक लमाणी (२८, रा. बेळगाव, कर्नाटक) यांच्यासमवेत निघाले होते. यावेळी कार धनगरवाडी हद्दीत मोटेवस्तीलगत आली असता अचानकपणे सर्व्हिस रोडवरुन आलेल्या कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की धडकेत सचिन तुपट हे गंभीर तर चालकासहित चारजण किरकोळ जखमी झाले होते. यावेळी संबंधितांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता सचिन लिंग्गाप्पा तुपट (३५, रा. तुरमुरी, जि. बेळगाव) यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी अपघातांमध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड यांच्या पथकाने अवघ्या आठ तासांमध्ये सुतावरून स्वर्ग गाठत तपासाची चक्रे फिरवली. कोणतेही धागेदोरे नसताना केवळ घटनास्थळी पडलेल्या टेम्पोचे कंटेनर बॉडी असलेल्या बंपरच्या सहाय्याने त्याचप्रमाणे महामार्गावरील व अपघात स्थळावरील जिल्ह्यातील धनगरवाडी ते पुणे जिल्ह्यातील विविध २७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभ्यास केला. कंटेनरची बॉडी असलेला टेम्पो (एमएच ०४ एचडी ८६७७) या टेम्पोवरील चालक दिनेश विश्वकर्मा याने अपघात केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शिरवळ पोलिसांनी टेम्पोचालक दिनेश विश्वकर्मा याला मोठ्या शिताफीने अटक केली.
संबंधित टेम्पो बंगळुरु येथून सातारा जिल्ह्यातील धनगरवाडी ता. खंडाळा हद्दीमध्ये एका हॉटेलवर नाष्टा करून ठाणे याठिकाणी निघाला असताना धनगरवाडी हद्दीमध्ये असणाऱ्या मोठे वस्तीलाइटच्या सर्व्हिस रोडवरील रस्ता दुभाजकामध्ये महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांमध्ये टेम्पो जात वाहनावरील नियंत्रण सुटून कारला धडक दिली. त्यानंतर अपघात स्थळावरून टेम्पोचालक दिनेश विश्वकर्मा याने पलायन केल्याचे शिरवळ पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
फरार झालेल्या दिनेश विश्वकर्मा याच्या अटकेनंतर अपघातामध्ये मृत झालेल्या सचिन तुपट याच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. संजय लमाणी यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, अमोल जगदाळे तपास करीत आहेत.