लोणंद : फलटण रोडवर तरडगाव हद्दीमध्ये रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चांदोबाच्या लिंबानजीक उभ्या असणाऱ्या ट्रकला जीपची जोराची धडक बसली. या अपघातामध्ये एक महिला ठार झाली असून, अन्य तीन प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद लोणंद पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. अंबुबाई बळवंत पाटील (वय ४०, रा. मद्री, ता. जि. सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तरडगाव हद्दीमध्ये असणाऱ्या चांदोबाच्या लिंबानजीक रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास (एमएच १२ एचडी ५८८८) हा मालट्रक उभा होता. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या जीप (के.ए. २८ एन ६०९२) च्या मालकाचा जीपवरील ताबा सुटून जीपची ट्रकला जोराची धडक बसली. या धडकेत अंबुबाई बळवंत पाटील (वय ४०, रा. मद्री, ता. जि. सोलापूर) या गंभीर जखमी झाल्या. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर सुग्राबाई सर्जेराव गोफणे (वय ३५), बळवंत गुणाजी पाटील (वय ५२), महादेवी सिद्धाण्णा मकाशी हे तिघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर लोणंद पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये पाठवून या घटनेचा पंचनामा केला आहे. पोलीस हवालदार शिवाजी तोडरमल हे अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
ट्रक-जीप धडकेत महिला ठार
By admin | Updated: April 3, 2016 23:43 IST