सातारा : सर्व्हिस रस्त्यावरून माॅर्निंग वाॅक करत असताना तिघा तरुणांच्या पुढ्यात उड्डान पुलावरून अचानक ट्रक कोसळला. दैव बलवत्तर म्हणून या तिघांचे जीव वाचले. दोन पावले पुढे हे युवक गेले असते तर होत्याचं नव्हतं झालं असतं. हा अपघात महामार्गावर शिवराज पेट्रोलपंपानजीक रविवारी पहाटे पाचच्या सुमारास झाला. मात्र, या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, अहमदाबादहून बेंगलोरकडे मालट्रक (केए ५१ एबी ४४७०) कपडे घेऊन निघाला होता. साताऱ्यातील शिवराज पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे मालट्रक उड्डाणपुलावरून तीस फूट सर्व्हिस रस्त्यावर कोसळला. याचवेळी तीन तरुण माॅर्निंग वाॅक करत होते. त्यांच्या पुढ्यातच ट्रक कोसळला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय या तरुणांना आला. अपघातानंतर मोठा आवाज झाला. त्यामुळे महामार्गालगत राहणारे आजूबाजूचे नागरिक झोपेतून जागे झाले. नागरिकांनी आणि माॅर्निंग वाॅक करणाऱ्या युवकांनी घटनास्थळी येत जखमींना ट्रकमधून बाहेर काढले. या अपघातात चालक वसीम रामतुल्ला शरीफ (वय २३, रा. कर्नाटक) हा किरकोळ जखमी झाला.
सकाळी आठ वाजेपर्यंत ट्रक सर्व्हिस रस्त्यावरच होता. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. अखेर हवालदार संजू गुसींगे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साह्याने ट्रक रस्त्यातून बाजूला केला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या अपघातात ट्रकच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे.
फोटो : ०५ सातारा ॲक्सिडेंट०२
फोटो ओळ : सातारा येथे रविवारी पहाटे महार्गावरील उड्डाणपुलावरून ट्रक तीस फूट खाली कोसळला. यामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला. (छाया : जावेद खान)