फलटण : जनावरांची अवयव कर्नाटकला घेऊन निघालेला ट्रक काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडला; परंतु पोलिसांनीच तो गायब केला. वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हालताच दीड तासानंतर ट्रक पुन्हा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला. ही घटना फलटण येथे घडली.याबाबत माहिती अशी की, येथील मुधोजी महाविद्यालयाजवळ गुरुवार, दि. ११ रोजी रात्री नऊच्या सुमारास जनावरांचे अवयव घेऊन ट्रक (केए २२ - ६४६४) कर्नाटकला निघाला होता. हा ट्रक यशवंत लेले, शशिकांत पवार, राहुल मुळीक ,स्वप्निल साळुंखे, आशिष कापसे, अमर संकपाळ यांनी पकडला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी ‘आम्ही पंचनामा करतो, तुम्ही पोलीस ठाण्यात जा,’ असे सांगून संघटनेच्या कार्यकर्त्यांना शहर पोलीस ठाण्यात पाठविले. संबंधित कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यात गेले असता कार्यकर्त्यांचे नाव, पत्ते, मोबाईल नंबर लिहून घेण्यास सुरुवात केली. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी नमते घेतले. तोपर्यंत सुमारे दीड तास ट्रक पोलीस ठाण्यात आला नव्हता अन् घटनास्थळावरही नव्हता. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सातारा, मुंबई येथे फोनाफोनी सुरू केल्यावर प्रभारी पोलीस निरीक्षकांनी ट्रक पोलीस ठाण्यात आणला. व त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
जनावरांचे अवयव घेऊन निघालेला ट्रक ठाण्यात
By admin | Updated: June 13, 2015 00:25 IST