लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल कुठल्याही क्षणी वाजू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडी तसेच भाजपने सैन्याची जमवाजमव सुरू केलेली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण तापले असून, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माण तालुक्यातील वावरहिरे इथे जोरदार राजकीय भाष्य करून प्रचाराची ठिणगी टाकली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. विद्यमान संचालक मंडळाला कोरोनामुळे तब्बल एक वर्षाची मुदतवाढ मिळाली. बँकेच्या निवडणुकीला राज्य शासनाकडून वारंवार स्थगिती मिळत आहे. आता ३१ मार्चपर्यंत ही स्थगिती वाढविण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला या निवडणुकीसाठी आवश्यक असलेली विविध सहकारी संस्थांचे ठराव जमा करून घेण्याची प्रक्रियाही सुरू होती. आता त्यासाठी ५ दिवस उरले आहेत. निवडणुकीवरील स्थगिती उठल्यानंतर पुढील ५ दिवसांत या ठरावांना अंतिम मान्यता दिली जाणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सहकारी संस्थांचे ठराव मागविण्याची स्थगिती उठवली होती. पुन्हा दि. २५ जानेवारीपर्यंत ठराव पाठविण्याचे आदेश सहकार विभागातर्फे देण्यात आले होते. जिल्हा बँकेचा स्थगित करण्यात आलेला ठराव जमा करण्याचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या १२ जानेवारीच्या आदेशानुसार पुन्हा सुरू करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा त्यावर स्थगिती बसली. आता ती कुठल्याही क्षणी उठण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीच्या रणांगणात भाजपनेही उडी घेतलेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या दिग्गज नेत्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान निर्माण करण्याच्या हालचाली भाजपने सुरू केलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार निवडणुकीवर वारंवार स्थगिती आदेश देऊन भाजपचे मनसुबे धुळीला मिळवत असल्याचे चित्र आहे.
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी विविध माध्यमातून प्रचार हाती घेतलेला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे संचालक रामराजे नाईक-निंबाळकर नुकतीच वावरहिरे इथे केंद्रातील भाजपचे धोरण आणि रिझर्व्ह बँकेची भूमिका या दोन्हींवर टीकास्त्र सोडून एकप्रकारे भाजपवासी झालेले आमदार व जिल्हा बँकेचे संचालक जयकुमार गोरे यांनाच आव्हान दिले आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला अवघड वाटते, त्या ठिकाणी विरोधकांना नामोहरम करण्याची संधी राष्ट्रवादीचे नेते सोडत नसल्याचे चित्र आहे.
चौकट..
९० टक्के ठराव जमा
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला वारंवार स्थगिती मिळत असल्याने सहकारी संस्थांचे ठराव सलगतेने जमा झालेले नाहीत. तरीही तब्बल ९० टक्के ठराव देण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. उर्वरित १० टक्के ठराव हे निवडणुकीवरील स्थगिती उठल्यानंतर ५ दिवसांच्या मुदतीत स्वीकारले जाणार आहेत.
चौकट..
जुनेच ठराव ‘नवे’ नाराज
दरम्यान, सातारा जिल्ह्यात ९०० विकास सेवा सोसायट्या आहेत. या सर्व सोसायट्या या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सदस्य आहेत. आता ग्रामपंचायत निवडणुकीची धूळ बसत नाही तोच सोसायट्यांमधील राजकारण पेटणार आहे. विकास सेवा सोसायट्यांच्या विद्यमान संचालकांची मुदत संपलेली असली तरी त्यांच्याच सहीचे ठराव सहकार विभागाला देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सोसायटीसाठी इच्छुक असणारे ‘नवे संचालक’ मात्र नाराज दिसत आहेत.