वाई : खावली-वाई रस्त्यावर मेणवली येथे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या मोटारीसह चारजणांना दोन लाख ७४ हजार ९६० रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले.
रविवारी रात्री वाई शहरात पेट्रोलिंग करत असताना भोर-खावली-वाई रस्त्यावर अवैध दारू विक्री करण्यासाठी मोटारीतून वाहतूक होत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांना मिळाली. याप्रमाणे खावली-धोम-वाई रस्त्यावर मेणवली गावच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना गाडी (एमएच ११सीडब्लू ४९१३) ही अवैध दारूचे बॉक्स विक्रीकरिता घेऊन जात असताना पकडण्यात आली. पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे व पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे व सहकाऱ्यांनी कारवाई केली. या कारवाईत शिवाजी वायदंडे, अजित जाधव, शिवाजी जाधव, रामचंद्र पवार आणि होमगार्ड येवले यांनी भाग घेतला. अधिक तपास तेलतुंबडे करत आहेत.