कऱ्हाड तालुक्यातील कोडोली, दुशेरे, शेरे परिसरातील गावांसह सांगली जिह्यातील होणारी वाहतूक थेट पुणे-बंगळूर महामार्गाला जोडण्यासाठी हा पूल लाभदायी ठरणार असून यासाठी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ते पाचवडेश्वर मार्गे कोडोली ते शेणोली स्टेशन असा रस्ता बांधण्यात आला आहे. नदीच्या दोन्ही बाजूचा रस्ता पूर्णही झाला आहे. कृष्णा नदीवरील पूल बांधण्यासाठी आजवर दोनवेळा सर्व्हेही करण्यात आला होता. मात्र पुलाच्या कामासाठी मुहूर्त लागत नव्हता. आता लवकरच या पुलाचे काम सुरू होत असल्याने परिसरातील गावांचा महामार्गाकडे जाण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
दरम्यान, डिसेंबर २०२० अखेर हे काम होणार होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते रखडले. आता नवीन वर्षात या कामास सुरुवात होत आहे. तासगाव रस्त्यावरून होणारी वाहतूक कऱ्हाड शहराच्या बाहेरून महामार्गाला जोडण्यासाठी बांधकाम विभागाच्या माध्यमातून शेणोली स्टेशनपासून शेरे, दुशेरे, कोडोलीमार्गे पाचवडेश्वर व पुढे महामार्ग असा रस्ता मंजूर करण्यात आला. त्यासाठी ४० लाख रुपये निधी मंजूर होऊन हे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पुलाचे काम रखडल्यामुळे हा रस्ता वापरात नव्हता. आता पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे तासगावकडून कऱ्हाड शहरात होणारा वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या परिसरातील लोकांना महामार्गावर जाणे अधिकच सोपे होणार आहे.
- चौकट
...असा असणार पूल
कृष्णा नदीवरील या पुलाचे काम ५०५४,०४ जिल्हा व इतर मार्ग यावरील भांडवली खर्च २०२०-२१ या योजनेअंतर्गत होणार आहे. पुलाच्या कामामध्ये ४० मीटरचे आठ गाळे असून पुलाची लांबी ३२० मीटर असणार आहे, तर रुंदी साडेसात मीटर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस संरक्षक भिंत उभारण्यात येणार असून पुलाच्या दोन्ही बाजूस रस्ता बनवण्यात येणार आहे.
फोटो : २५केआरडी०५
कॅप्शन :
पाचवडेश्वर, ता. कऱ्हाड येथे कृष्णा नदीवर पूल उभारण्यासाठी भूगर्भातील थराची चाचणी घेण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.