तळमावले : तळमावले येथील एस.टी. बसथांबा परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, ती सुरळीत करण्याची मागणी होत आहे. तळमावले ही परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. आसपासच्या गावांसह वाडी-वस्त्यांतील ग्रामस्थ खरेदीसाठी या ठिकाणी येत असतात. तसेच बाजारपेठेतूनच कऱ्हाड-ढेबेवाडी मार्ग गेल्यामुळे येथे अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते. वडापची वाहने रस्त्यातच थांबतात. तसेच काही विक्रेते रस्त्यावर आपला व्यवसाय मांडतात. त्यामुळे कोंडीत भर पडत असून या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमण्याची गरज आहे.
कऱ्हाडात कचरा टाकणाऱ्यांवर वॉच
कऱ्हाड : कऱ्हाड शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास १०० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत दंड केला जात आहे. पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, याच्या कारवाईसाठी एक पथकही स्थापन केले आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचारी सध्या पालिकेने घेतलेल्या निर्णयाची कडक स्वरूपात अंमलबजावणी करीत आहेत. त्यांच्याकडून शहरात ठिकठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर वॉच ठेवला जात आहे. संबंधितांना पकडून त्यांना दंडही केला जात आहे. नागरिकांनी कचरा इतरत्र न टाकता घंटागाडीत टाकावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
विद्यानगरमध्ये कचरा टाकल्यामुळे दुर्गंधी
कऱ्हाड : येथील कृष्णा कॅनॉल ते विद्यानगर या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. महाविद्यालय परिसरातील दुकानदार तसेच नागरिकांकडून घरातील सुका तसेच ओला कचरा उघड्यावरच टाकला जात आहे. कृष्णा पुलानजीकही कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. पुलाच्या प्रवेशद्वारातच कचरा विखुरलेला असतो. त्याचा त्रास प्रवाशांसह परिसरातील नागरिकांना होत आहे. सैदापूर ग्रामपंचायतीने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
गुऱ्हाळघरांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात
कऱ्हाड : सध्या कऱ्हाड तालुक्यातील तांबवे, वसंतगड, येरवळे परिसरांतील गुऱ्हाळघरांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गुऱ्हाळघरांसाठी ऊस उत्पादक शेतकरी आपले उसाचे पीक घेऊन येत आहेत. उसाच्या रसापासून एक किलोपासून दहा किलोंपर्यंत गुळाच्या ढेपा बनविल्या जात आहेत. दिवाळीपासून गुऱ्हाळघरांची घरघर सुरू होते. त्यानंतर कित्येक टन उसाचे गाळप केले जाते. सध्या गुळाला चांगला दर असल्यामुळे शेतकऱ्यांचाही गुऱ्हाळघरांकडे ओढा वाढला असून, सध्या गळिताचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने तोड मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
उन्हाचा तडाखा वाढला; कलिंगड खरेदीला गर्दी
कऱ्हाड : शहरात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत आहे. उपजिल्हा रुग्णालय, बसस्थानकाच्या परिसरात मोठ्या संख्येने विक्रेत्यांकडून कलिंगड विक्रीसाठी स्टॉल उभारले आहेत. उन्हापासून थंडावा मिळावा म्हणून नागरिक कलिंगड खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. सध्या कलिंगडाचा दर दहा रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत आहे. काही ठिकाणी मोठ्या आकाराची कलिंगडे ४० ते ५० रुपयांनाही विकली जात आहेत. शहरासह उपनगर आणि महामार्गाकडेलाही अनेक विक्रेते बसल्याचे दिसून येत आहे.