वाहतुकीचा खोळंबा
सातारा : शहरातील मोती चौक, खणआळी, सायन्स कॉलेज तसेच पंचायत समिती परिसरात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. काही वाहनधारक नो पार्किंग असूनही रस्त्याकडेला वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक हतबल झाले आहेत. वाहतूक पोलिसांची रहदारीच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
हिवताप विभागाकडून
बाधित क्षेत्राची पाहणी
सातारा : सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या आजारावर प्रतिबंध आणण्यासाठी पालिकेकडून खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी धूर व औषध फवारणी केली जात आहे. प्रामुख्याने सदर बझार, लक्ष्मी टेकडी, माची पेठ, मल्हारपेठ, दुर्गापेठ, गुरुवार परज या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम यांनी देखील सदर बझार, लक्ष्मीटेकडी या परिसराला भेट देऊन नागरिकांना सुरक्षिततेबाबत सूचना केल्या.
श्वानांच्या उपद्रवामुळे
नागरिकांमध्ये भीती
सातारा : शहरातील गुरुवार पेठ, माची पेठ, चिमणपुरा पेठ व बोगदा परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांची संख्या वाढू लागली आहे. हे श्वान पादचाऱ्यांसह नागरिकांच्या अंगावर धावून येत असल्याने नागरिकांसह महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या श्वानांमुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे जिकिरीचे बनले आहे. पालिकेने भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
महावितरणने हटविल्या
धोकादायक फांद्या
सातारा : पावसाने उघडीप दिल्याने महावितरण विभागाने वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या धोकादायक फांद्या हटविण्याचे काम हाती घेतले आहे. महावितरण कर्मचाऱ्यांकडून माची पेठ, केसरकर पेठ येथील झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्यात आल्या. नागरिकांकडून तक्रारी दाखल झाल्यानंतर महावितरण विभागाकडून तातडीने ही मोहीम हाती घेण्यात आली.