संघाचे जिल्हाध्यक्ष शामराव गोळे यांच्या नेतृत्वाखाली संघाचे जिल्हा पालकमंत्री उमेश महाडिक, तालुका प्रतिनिधी भरत थोरात, दत्ता साळुंखे, संभाजी पारवे यांच्यासह बांधकाम मजुरांनी हा मोर्चा काढला.
शहरातील दत्त चौकातून आंदोलनास सुरुवात झाली. तालुक्यातून शेकडो असंघटित व संघटित मजुरांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. तालुका प्रतिनिधी भरत थोरात यांनी संघाच्या मागण्या मांडल्या. खाद्यतेलासह इतर तेल आणि जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमी करून भाववाढ नियंत्रण आणि पेट्रोल पदार्थ जीएसटी क्षेत्रात आणणे, प्रत्येक वस्तूचा उत्पादन खर्च छापणे बंधनकारक करणे, सर्व संघटित व असंघटित कामगारांना दहा हजार रुपये अनुदान देणे यासह महागाई नियंत्रणाशी निगडीत अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्हा कार्यकारिणीतील उमेश महाडिक यांनी भारतीय मजदूर संघ देशव्यापी पातळीवर या मागण्यांसंदर्भात करीत असलेल्या आंदोलनाची रूपरेषा सांगितली. दत्ता साळुंखे व संभाजी पारवे यांनी आभार मानले. मजदूर संघाच्यावतीने करण्यात आलेल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना तालुका प्रतिनिधींच्यावतीने देण्यात आले.
फोटो : १२केआरडी
कॅप्शन : कऱ्हाडच्या तहसील कार्यालयासमोर भारतीय मजदूर संघाच्यावतीने निदर्शने करण्यात आली.