कोरेगाव : दुष्काळी परिस्थितीवर मात करून कमी पाण्यात शेतीचे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याच्या हेतूने जिल्ह्यात आदर्श ग्राम म्हणून नावलौकिक मिळवलेल्या हिवरे आणि कवडेवाडीत जिल्हा बँक व फिनोलेक्स प्लासॉनने चारशे एकर क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा पायलेट प्रोजेक्ट केला आहे. शनिवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे. सरपंच अजित खताळ यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या पुढाकाराने व फिनोलेक्स प्लासॉनचे अभियंता प्रल्हाद वायदंडे तसेच तालुक्याचे अधिकृत वितरक सिद्धिविनायक इरिगेटर्सचे संचालक योगेश पानबुडे यांच्या सहकार्यातून ‘फिनोलेक्स ठिबक ग्राम’ साकार होत आहे. सरपंच अजित खताळ व कवडेवाडीच्या सरपंच लक्ष्मीबाई शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा केली. त्यानंतर शेतकऱ्यांची व्यापक बैठक घेऊन फिनोलेक्स ठिबक ग्राम करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी या प्रकल्पामध्ये विशेष लक्ष दिले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावचे विभागीय विकास अधिकारी शहाजीराव माने, विकास अधिकारी संदीप शिंदे यांनी या प्रकल्पाला मूर्त स्वरूप दिले आहे. फिनोलेक्स प्लासॉनचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत जाधव, जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत देशमुख व हिवरे विकास सोसायटीचे सचिव विठ्ठल भोईटे यांनी पायलेट प्रोजेक्टची संकल्पना शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवली आणि दोन्ही गावांतील सुमारे २५० शेतकरी या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाले. बँकेने विकास सोसायटीमार्फत सभासद शेतकऱ्यांना एकरी ४५ हजार रुपये अर्थसहाय्य केले आहे. शनिवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांच्या हस्ते व जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास फिनोलेक्स प्लासॉनचे सरव्यवस्थापक संतोष तळेले, सुनील पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ, उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठल भुजबळ, तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी शहाजीराव माने यांच्यासह कृषी क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील नागरिक व शेतकरी यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच अजित खताळ व कवडेवाडीच्या सरपंच लक्ष्मीबाई शिंदे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)माती परीक्षण व मार्गदर्शनपायलेट प्रोजेक्ट लोकार्पण सोहळ्यादरम्यान फिनोलेक्स प्लासॉन कंपनीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी माती व पाणी परीक्षण सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना केवळ ठिबक सिंचन यंत्रणा देऊन कंपनी थांबणार नाही, तर भविष्यकाळात अविरत मार्गदर्शन करणार आहे. कंपनीचे कृषितज्ज्ञ विठ्ठल गोरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कंपनीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊ केला असून, या प्रोजेक्टमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विशेष सवलत देखील देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फिनोलेक्स प्लासॉनचे अभियंता प्रल्हाद वायदंडे व वितरक योगेश पानबुडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पहिल्या ठिबक ग्रामचे आज हिवरे-
By admin | Updated: March 25, 2016 23:32 IST