सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. दरम्यान, कारखान्याने एफआरपी कायद्यानुसार थकीत रकमेचे व्याज द्यावे, यासाठी वाई प्रांत कार्यालयातर्फे पत्रव्यवहार केला आहे.
किसन वीर कारखान्याने थकीत एफआरपीची रक्कम ३,३८२.४३ लाख व त्यावरील व्याज थकविले होते. शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळावेत, यासाठी साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल झाल्या होत्या. साखर आयुक्तांनी कारखान्यावर आरआरसी कारवाईचा बडगा उगारला होता.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य प्रवक्ते अर्जुनराव साळुंखे, तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ व इतर सहकाऱ्यांनी कोरोना काळातही तीव्र आंदोलन केले. किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या सातारा येथील निवासस्थानी अनेक दिवस रात्रंदिवस त्यांनी आंदोलन केले. तसेच कारखान्याचे माजी संचालक प्रवीण बाबर यांनीदेखील थकीत एफआरपीची रक्कम मिळत नसल्याने कारखान्याविरोधात साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेऊन कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा केली. मात्र, व्याज भरले नसल्याने प्रांताधिकारी संगीता राजापूरकर- चौगुले यांनी साखर विभागाच्या विशेष लेखापरीक्षकांना वसुलीबाबतचे पत्र दिले आहे.
कोट...
‘स्वाभिमानी’च्या अभ्यासपूर्ण लढ्याला जबरदस्त यश आले आहे. सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच थकीत ऊसबिल वसुली १५ व्याजासह वसुलीस सुरुवात झाली. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांकडून थकीत ऊसबिलापोटी कायदेशीर १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. किसन वीर सहकारी साखर कारखाना, भुईंज यांच्याकडून व्याज वसुली प्रक्रिया सुरू झाल्याशिवाय थांबणार नाही.
- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
‘स्वाभिमानी’कडून निवडणुकीची तयारी
या सातत्यपूर्ण आंदोलनाची दखल सर्वसामान्य शेतकरी व सभासद कामगारांनी घेऊन आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किसन वीर कारखान्याची निवडणूक लढवावी, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. याही मागणीबाबत संस्थापक-अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असे राजू शेळके यांनी सांगितले.