वाळूचे ढीग रस्त्यावर
सातारा : सातारा शहरात आता पावसाने उघडीप दिली आहे. तसेच कोरोनाचे सावट कमी झाले असल्याने इमारत बांधकामाचा वेग वाढला आहे. मात्र, बांधकामासाठी आणलेले कचऱ्याचे ढीग रस्त्यातच पडत आहेत. त्यामुळे वाहने घसरण्याचे प्रमाणात वाढत झाले आहे. त्यामुळे दुचाकीस्वार जखमी होत असतात. त्यामुळे वाळू हटविण्याची मागणी होत आहे.
एसटीला फटका
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीपोटी सातारकरांनी एसटी प्रवास कमी केला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या विविध मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. तसेच लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या बसेसच्या फेऱ्याही कमी केल्या आहेत.
फलकाची मागणी
सातारा : मेढा-महाबळेश्वर मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून, वळण, अपघातप्रवण क्षेत्र आदी सूचनांचे फलक लावावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. सातारा-मेढा-महाबळेश्वर या रस्त्याचे काम सुरू असून, मोऱ्या व नाल्याचे काम करताना जुने सूचना फलक निघाले आहेत.
खुदाईने रस्त्यांची वाट
सातारा : शहरातील ठिकठिकाणी पाणी गळती, नवीन नळ कनेक्शन, इंटरनेट वायरिंगसाठी खोदकामे सुरू असल्याने रस्त्यांची वाट लागत असून, वाहनधारकांची गैरसोय होत आहे. शहरातील राजपथ, शाहू चौक, देवी चौक परिसरात पाणी गळतीसाठी ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे.
कुत्र्यांची दहशत
सातारा : येथील गुरुवारपेठ, चिमणपुरा पेठ व बोगदा परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरू आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भटकी कुत्री पादचाऱ्यांचा अंगावर धावून जात आहेत. पालिकेने या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
फिरायला गर्दी
सातारा : साताऱ्यातील राजवाडा, कुरणेश्वर, अजिंक्यतारा किल्ला परिसरात दररोज सकाळी फिरायला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. थंडीचे प्रमाण कमी होते. तेव्हा पहाटे ५ वाजल्यापासूनच सातारकर फिरायला येत होते. पण आता थंडीमुळे सहानंतर लोक फिरण्यासाठी जात असतात.
कचऱ्यामुळे दुर्गंधी
सातारा : वासोळे, ता. सातारा येथील धोम कालव्याच्या भरावावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या कचऱ्यामुळे कालव्याच्या दरवाजामध्ये अडकून राहत असल्याने पुढे होणारा पाण्याचा प्रवाह संथ होत आहे. तसेच कचरायुक्त पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कालव्याच्या बाजूला ऊसतोड मजुरांनी राहुट्या उभारल्या आहेत.
एटीएम मशीन बंद
सातारा : शहरातील महाविद्यालय परिसरातील काही एटीएम वारंवार बंद राहत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. एक वर्षानंतर महाविद्यालये सुरू झाली असून, परीक्षा फाॅर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. तसेच विद्यार्थ्यांना पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्यापेक्षा जवळच्या एटीएममध्ये जाणे सोपे आहे.
रस्त्यावर गटारगंगा
सातारा : नगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गोडोली साईबाबा मंदिर ते अण्णासाहेब कल्याणी विद्यालय रोडवर भद्रकाली दुकानासमोर गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हे दुखणे वर्षानुवर्षे कायम असून, स्थानिक वैतागले आहेत.
महामार्गावर पुन्हा खड्डे
सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावर पाचवडच्या पुढे असणाऱ्या एका पेट्रोलपंपानजीक महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे ठिकाणी अपघातासारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना खड्डे दिसत नसल्याने वाहने जोरात आदळत आहेत.