सातारा : पुनर्वसन जमीन विक्रीस परवानगी मिळावी, या कामासाठी येथील जिल्हा पुनर्वसन कार्यालयातील तलाठी नीता उत्तम शिंदे (वय २७, सध्या रा. उत्तेकरनगर, सातारा. मूळ रा. गारवडे, ता. पाटण) हिच्यासह एक एजंट आणि एका खासगी व्यक्तीला चाळीस हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. या घटनेमुळे पुनर्वसन कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. बरड (ता. फलटण) येथील एका व्यक्तीला पुनर्वसन जमिनीवरील शर्त उठवायची होती. त्यासाठी ते साताऱ्यातील जिल्हा पुनर्वसन कार्यालयात आले. यावेळी तेथे असलेला एजंट शहाजी बाळासाहेब शिंदे (४७, रा. इंदवली, पो. करंदी, ता. जावळी) हा त्यांना भेटला. यावेळी त्याने तक्रारदाराकडे २५ हजारांची मागणी केली; मात्र ‘एवढे पैसे देण्यास जमणार नाही,’ असे त्या तक्रारदाराने सांगितल्यानंतर अखेर दहा हजारांवर त्यांची तडजोड झाली होती, असे असताना पुन्हा संबंधित तक्रारदार तलाठी नीता शिंदेला भेटले. त्यावेळी शिंदेने त्यांच्याकडे तीस हजारांची मागणी केली; परंतु हे पैसे ‘खास मर्जीतील’असलेली खासगी व्यक्ती ब्रह्मनाथ सुखदेव लांडगे (२८, मूळ रा. सावळेश्वर, ता. मोहोळ जि. सोलापूर) याच्याकडे देण्यास सांगितले. दरम्यान, संबंधित तक्रारदाराला दोन्ही बाजूंकडून पैशांची मागणी झाल्यामुळे त्यांनी ६ एप्रिलला ‘एसीबी’कडे तक्रार नोंदविली. त्यानुसार ‘एसीबी’च्या टीमने पडताळणी करून या त्रिकुटावर नजर ठेवली. त्यानुसार शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी ‘एसीबी’ने एजंट शहाजी शिंदे याला दहा हजारांची, तर ब्रह्मनाथ लांडगे याला तीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. (प्रतिनिधी)
तिघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात !
By admin | Updated: April 19, 2015 00:46 IST