वाठार स्टेशन : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना, कोरोना तपासणीचा वेगही आता वाढला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना रुग्ण तपासणी सुरू आहे. या तपासणीचे अहवाल चुकीचे येत असल्याने मोठा गोधळ उडत आहे. एकाच व्यक्तीचे वेगवेगळे तीन अहवाल आले आहेत.
कोरेगाव तालुक्यातील पळशी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रअंतर्गत देऊर गावात दोन दिवसांपूर्वी एका रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. त्यावेळी तो रुग्ण निगेटिव्ह दाखवला. तसा त्यांना मोबाईलवर अहवालही प्राप्त झाला. त्यामुळे हा रुग्ण शेकडोजणांच्या संपर्कात आला. दुसऱ्यादिवशी ‘तुमचा रिपोर्ट बाधित आला आहे,’ अशी धक्कादायक माहिती आरोग्य केंद्राकडून देण्यात आली. त्यामुळे या रुग्णाला घरातच थाबविण्यात आले. एकाच तपासणीचे दोन वेगवेगळे अहवाल आल्यामुळे आरोग्य केंद्राच्या तपासणीबद्दल आता शंका व्यक्त होऊ लागली आहे.
त्यानंतर दुसऱ्यादिवशी पुन्हा या रुग्णाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी याच रुग्णाचा अहवाल पुन्हा निगेटिव्ह आल्याने कोरोना तपासणीबाबत मोठा गोधळ निर्माण झाला आहे. एकाच रुग्णाचे दोन दिवसात तीन वेगवेगळे अहवाल येत असतील, तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय पहिल्यादिवशी निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर रुग्ण बाहेर पडला. त्यावेळी रुग्ण संपर्कात आलेल्या लोकांचे काय, असाही प्रश्न आरोग्य विभागाच्या या अहवालानंतर विचारला जात आहे.