कऱ्हाड : ‘ओला, उबेर या प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगत उशिरा झालेले रिक्षा परवाने नूतनीकरण करण्याचे तसेच बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीला आळा घालणार आहे,’ असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आश्वासन दिले आहे. परिवहन मंत्री रावते यांनी दिलेल्या आश्वासनामुळे कऱ्हाड अॅटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दि. २३, २४ व २५ रोजी पुकारण्यात आलेल्या ७२ तासांच्या स्वयंघोषित बंदला स्थगिती दिल्याची घोषणा कृती समितीचे राज्य सरचिटणीस बाबा कांबळे यांनी केली.अॅटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत मंगळवार, दि. २१ रोजी मुंबई येथे बैठकीत पार पडली. यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्दे, कृती समितीचे राज्य सरचिटणीस बाबा कांबळे, मुंबई रिक्षा मेन्स युनियन अध्यक्ष शशांक राव, कृष्णा कऱ्हाड तालुका अॅटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष गफार नदाफ, प्रमोद घोणे, बाबा शिंदे, पुणे, कासम मुलाणी, नवी मुंबई, संभानाथ काळे, परभणी, महिपत पवार, सोलापूर, मल्हार गायकवाड, कल्याण डोंबिवली, बाळा जगदाळे, पनवेल, विजय गरद, रायगड पेण, गणेश देवकर, खोपोली, बापू भावे, फारूक बागवान, भागवत गरद, रहीम पटेल, मधुसुदन रहाणे, वसई, अरविंद पाटील, विनोद वरखडे, शिवार कांबळे, जहांगिर सय्यद, प्रल्हाद सोनवणे, जळगाव, नरेंद्र गायकवाड , नांदेड, राजू इंगळे, नागपूर, किरण गवळी, नंदूरबार, अशोक साळेकर, महादेव पवार, सांगली, दिलीप शिंदे, जालना, निसार अहमद, औरंगाबाद आदी राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.अॅटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने गुरुवारपासून राज्यातील १५ लाख रिक्षा चालकांनी बंद जाहीर केला होता. या बंदची दखल घेत आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या प्रयत्नातून शासन व रिक्षा संघटना पदाधिकारी यांची मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत रिक्षा चालकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. रिक्षा संघटनेच्या वतीने १७ मागण्या करण्यात आल्या होत्या. या सर्व मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. सुमारे तीन तास पदाधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर राज्यभर करण्यात येणाऱ्या बंदला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. शासनाने दिलेल्या आश्वासनामुळे संपास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शासनाने दिलेले आश्वासन जून महिन्यापर्यंत पूर्ण न केल्यास पुन्हा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला. (प्रतिनिधी)
तीन दिवसीय रिक्षा बंदला स्थगिती
By admin | Updated: April 23, 2015 00:55 IST