कोरेगाव : आसरे, ता. कोरेगाव येथील विशाल अशोक यादव याच्या ‘तीन बिघा’ नावाच्या शिवारातील खूनप्रकरणी पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री दोघांना अटक केली आहे. विक्रम रामचंद्र पिसाळ व सोनू महेश सक्सेना (दोघेही रा. महादेवनगर, कोरेगाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, जमिनीच्या व्यवहारातून आणि जुन्या भांडणाच्या रागातून खून केल्याचे स्पष्ट केले आहे. दोघांची पाच दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशाल अशोक यादव (वय २१) याचा दि. ६ मे रोजी मध्यरात्री महादेवनगर नजीकच्या ‘तीन बिघा’ नावाच्या शिवारात खून झाला होता. ज्या दिवशी विशालचा खून झाला होता, त्याच्या अगोदर त्याची चार-पाच ठिकाणी भांडणे आणि किरकोळ मारामारी झाली होती. विशालबरोबर झालेल्या भांडणांबद्दल पोलीस ठाण्यात आजवर दाखल झालेल्या तक्रारींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. त्त्यांनी मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे विशालच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी आणि शहानिशा केली, त्यातून विक्रम रामचंद्र पिसाळ याचे नाव समोर आले. त्याला चौकशीला बोलाविले असता, त्याने टाळाटाळ केली आणि तो फरार झाला होता. त्याचदरम्यान, त्याने मोबाईल सीमकार्ड आणि हँडसेट बदलल्याने त्याचा शोध घेणे मुश्किल बनले होते. पोलीस निरीक्षक धस यांनी अखेरीस बुधवारी मध्यरात्री विक्रम पिसाळ याला कोरेगावात ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी असता, त्याने सांगितले की, विशालची आई सविता आणि वडील अशोक यांची वर्धनगड येथे दोन ठिकाणी शेतजमीन असून, तिचा व्यवहार ठरविला होता. दोन्ही जमिनींमध्ये कायदेशीर बाबींची अडचण होती, तो सोडवून व्यवहार करण्याचे दोघांना मान्य होते. पहिला व्यवहार अर्धवट राहिला आणि दुसऱ्या व्यवहारात नोटराईज करारनामा करत सुमारे पावणेसात लाखांहून अधिक रक्कम घेऊन देखील यादव कुटुंबीय दुसऱ्या व्यक्तीला वाढीव किंमतीला जमीन विकणार असल्याचे सातत्याने सांगत होते. आपण स्वत: कमावलेली रक्कम आणि नातेवाइकांकडून जमा केलेली रक्कम पाण्यात जाणार असल्याचे पाहून विक्रम पिसाळ हा अत्यवस्थ झाला होता. विशाल याने दुसऱ्या व्यक्तीला शेतजमीनविकणार असल्याचे सांगितले होते. (प्रतिनिधी) खुनासाठी सोनूने केली मदत...सोनू महेश सक्सेना हा मूळ उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बहा तालुक्यातील पातीपुरा या गावचा रहिवासी आहे. तो लहानपणीच कोरेगावात आपल्या कुटुंबीयांसमवेत आला होता. त्याचे आणि कुटुंबीयांचे पटत नसल्याने तो मित्र विक्रम पिसाळ याच्या दुकानावर रात्री झोपत असे. विशेष म्हणजे, सोनूची आणि विशालची एकदा भांडणे झाली होती, त्यावेळी विशालने त्याला ‘तुला कापतो,’ अशी धमकी दिली होती. त्याचा राग सोनूच्या मनातच होता. त्याने आपल्या जुन्या भांडणाची खुन्नस काढली.
‘तीन बिघा’तील खून जमिनीसाठीच
By admin | Updated: May 14, 2015 23:56 IST