पेट्री : जागतिक वारसा स्थळात समावेश झालेल्या कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू असल्याने शनिवार, रविवारी हजारो पर्यटक कास पुष्पपठाराला भेट देत आहेत. फुलांसाठी वातावरण पोषक असल्याने पठार अनेकविध रंगीबेरंगी फुलांनी बहरू लागले आहे. दरम्यान, रविवारी जिल्हा, परजिल्ह्यातून हजारो पर्यटकांनी कास पुष्प पठार पाहण्यासाठी कुटुंबासमवेत गर्दी केली होती.
पठारावरील गेंद, सीतेची आसवे, तेरडा, सोनकी, अबोलीमा, अभाळी, नभाळी, मंजिरी, चवर, टुथब्रश, कापरू, पंद, भुईचक्र, स्मितीया यासारखी अनेक फुले तुरळक प्रमाणात आली आहेत. काही ठिकाणी निळ्या, पांढऱ्या रंगाचे छोटे छोटे गालीचे तयार होऊ लागले आहेत. पठारावरील नयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटकांनी रविवारी कासला भेट देऊन येथील रंगोत्सव स्वानुभवला. दरम्यान, पर्यटक फुलांसमवेत स्वतःला कॅमेरा बंद करत सेल्फी तसेच फोटोसेशन मोठ्या प्रमाणावर करताना दिसत होते.
सध्या जांभळ्या, पांढऱ्या रंगाची तुरळक छटा पर्यटकांना दिसत आहेत. चोहोबाजूला हिरवागार निसर्ग, पावसाची अधूनमधून संततधार, गुलाबी थंडी, दाट धुके यामुळे पर्यटक कुटुंबासमवेत पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. वाहनतळाच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर वाहनांचा ताफा पाहावयास मिळत होता. शनिवार-रविवार गर्दी करण्यापेक्षा सोमवार ते शुक्रवार पठाराला भेट देऊन पर्यटकांनी कासच्या निसर्गाचा आनंद घ्यावा, असे आवाहनही समिती सदस्य ज्ञानेश्वर आखाडे यांनी केले आहे.
चौकट
कुमुदिनी तलाव बहरलेलेच
कास पठारावरील महाबळेश्वरकडे जाणाऱ्या राजमार्गावरील तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुमुदिनी तलावात नायफांडिस इंडिका (कुमुदिनी) नावाची कमळे जुलैमध्येच फुलली आहेत. तलाव असंख्य फुलांनी बहरलेले पाहावयास मिळत आहे. तलावात मोजता येणार नाही एवढी पांढरी शुभ्र कमळे फुललेली पाहण्यासाठी पर्यटक भेट देत आहेत.
कोट
कास पठारावरील विविधरंगी व दुर्मिळ फुले पाहत असताना पायदळी तुडवली जाणार नाहीत याची पर्यटकांनी काळजी घेऊन येथील निसर्गसौंदर्यचा वारसा जपावा. कार्यकारिणी समिती उत्तम प्रकारे काम करत असून, पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना सहकार्य करावे.
- मारुती चिकणे,
अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती
फोटो ०६कास-ट्युरिस्ट
कास पठारावरील फुलांचा हंगाम जोमात सुरू असून राज्याच्या विविध भागातून हजारो पर्यटक दाखल झाले होते. (छाया : सागर चव्हाण)
( छाया -सागर चव्हाण )