चाफळ : कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा कुलूपबंद आहेत. काही शैक्षणिक कामानिमित्त शाळा उघडल्या जातात. याव्यतिरिक्त शाळांचे आवार निशब्द असते. शाळा बंद असल्याची आयती संधी साधून चोरटे बंद शाळांवर डल्ला मारू लागले आहेत.
शाळेच्या बंद खोल्यांवर नजर ठेवून चोरटे किमती वस्तू गायब करू लागले आहेत. चाफळ विभागात एकाच आठवड्यात दोन बंद शाळांमधून हजारो रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
याबाबत माहिती अशी की, विभागातील केळोली येथे काही दिवसांपूर्वी अंगणवाडी शाळेत संगणक चोरीची घटना घडली होती. या घटनेचा तपास सुरू असतानाच नानेगाव खुर्द येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमधून तीन संगणक, प्रिंटर व प्रोजेक्टर चोरून नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. चाफळ-पाडळोशी रस्त्यालगत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे हायस्कूल आहे. या ठिकाणी सोमवारी सकाळी या शाळेचे शिपाई शाळेमध्ये आले असता त्यांना शाळेतील ऑफिसचा कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला. ही माहिती आसपासच्या नागरिकांना समजताच नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली. या वेळी कार्यालयात जाऊन पाहिले असता कार्यालयातील तीन संगणक संच, प्रिंटर, प्रोजेक्टर अज्ञातांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस दूरक्षेत्रांमध्ये झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमृत आळंदे तपास करीत आहेत.