कऱ्हाड : कोरोनाच्या संकटामुळे गत दीड वर्षापासून शाळा कुलूपबंद आहेत. शैक्षणिक कामकाज पूर्ण करण्यासाठी फक्त शाळा उघडल्या जातात. याव्यतिरिक्त शाळांचे आवार नि:शब्द असते. बंद शाळा संधी समजून चोरटे त्यांना ‘टार्गेट’ करत आहेत. बंद शाळा खोल्यांत किमती वस्तूंवर नजर ठेवून त्या गायब केल्या जात आहेत. शेरेतील शाळेतून दीड लाख रुपयांचे सहा टीव्ही संच चोरीस गेल्यानंतर या घटना समोर येत आहेत.
कोरोनाने मार्च २०१९ च्या अंतिम टप्प्यात विळखा घातला. त्यामुळे जनजीवन व नागरिक मोठ्या संकटात सापडले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलून कडक निर्बंध लावले. त्यामध्ये शाळा व महाविद्यालयांना कुलूपबंद ठेवण्यात आले. ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा अवलंब सुरू झाला. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक कामकाजासाठी मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, तसेच कर्मचाऱ्यांचा दैनंदिन राबता सुरू आहे. त्याउलट जिल्हा परिषद शाळांवर कामकाजाचा भार तितका नसल्याने शाळेत शिक्षकांची उपस्थिती जेमतेम राहत आहे. शिक्षक कार्यालयीन कामासाठी शाळेत हजर राहतात. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असल्याने वर्क फ्रॉम होम काम सुरू आहे. त्यामुळे शाळांचे आवार बंद आहे. मात्र, चोरट्यांनी ही संधी समजून बंद शाळांतील किमती वस्तूंवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. याची प्रचिती शेरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत नुकतीच आली. त्या शाळेतील सहा वर्ग खोल्यांतील सहा स्मार्ट टीव्ही अज्ञात चोरट्यांनी गायब केले आहेत. साहित्याची मोडतोड करण्याचे प्रकार वाढले आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.