सातारा : तालुक्यातील हमदाबाज येथे एका हॉटेलमध्ये पाच हजारांची चोरी झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबतची तक्रार वजाद नाशीर शेखर (वय २५, रा. दुर्गा पेठ, जुना सरकारी दवाखान्यासमोर, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. वजाद यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वजाद हे हॉटेल व्यावसायिक असून, त्यांचे सातारा ते मेढा रस्त्यावर हमदाबाज येथे सेव्हन हिल्स रेस्टॉरंट आहे. दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी दीड ते शनिवार, दि. ४ रोजी सकाळी पावणेबारा या कालावधीत अज्ञाताने हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या तंदूर भट्टीच्या शेडमधून किचनमध्ये प्रवेश केला. हाॅटेलमधील इन्हर्टर, बॅटरी आणि भांडी असे पाच हजारांचे साहित्य लंपास केले. ही बाब लक्षात आल्यानंतर वजाद यांनी शनिवार, दि. ४ रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर अज्ञातावर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक फौजदार देशमाने करत आहेत.