सातारा : तालुक्यातील जगमीन (ठोसेघर) येथील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्कीच्या कंट्रोल रुममधून १५ हजार रुपयांची तांब्याची तारचोरी केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. ही घटना दि. १३ डिसेंबर २०२० दुपारी १.३० ते सायंकाळी ६ या वेळेत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जगमीन (ठोसेघर) गावच्या हद्दीत सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस लि. पुणे यांची साइट आहे. येथे असणाऱ्या सेक्शन क्रमांक एकमधील पवनचक्की टॉवर नंबर-सी-१२ या पवनचक्कीच्या कंट्रोलरुमपासून टॉवरकडे जाणाऱ्या शिडीवरील आतील बाजूला तांब्याची तार असलेल्या सहा केबल चोरून नेल्या. याची लांबी तीनशे मीटर असून, किंमत १५ हजार रुपये आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर कंपनीच्या चिखली, वनकुसवडे परिसरात सुरक्षा अधिकारी असलेल्या दीपक वसंत घाडगे (वय ४१, मूळ रा. म्हावशी, ता. पाटण, जि. सातारा) यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञाताच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.