फलटण : फलटण तालुक्यातील गिरवी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आला. त्यामुळे त्याच्या संपर्कातील दहा जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. वसुलीच्या टार्गेटमुळे हे कर्मचारी सर्वत्र फिरत असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या मार्च एंडमुळे महावितरणतर्फे मोठ्या प्रमाणात वसुलीचा तगादा फलटण तालुक्यात ठिकठिकाणी सुरू आहे. अनेकांची कनेक्शन कापण्यात आली असून घरोघरी महावितरणचे कर्मचारी फिरत आहेत. अनेकांचे वीज कनेक्शन कट झाल्यामुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात खटके उडत आहेत. त्यातच गिरवी कार्यालयातील एक कर्मचारी कोरोनाबाधित आला. त्याच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील दहा जणांना होम क्वारंटाइन करण्याचे व नंतर त्यांची टेस्ट घेण्याचे महावितरणच्या कार्यालयाला आरोग्य विभागाने कळविले आहे. हे सर्व जण विविध कारणांनी नागरिकांमध्ये फिरलेले असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या संपर्कामधील नागरिकांचा शोध सुरू असून सध्या तरी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.