सागर गुजर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य शासनाने सर्वप्रकारची प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या पावणेदोन वर्षांपासून मंदिरे बंद असून, त्यावर अवलंबून असणारे लोक अडचणीत सापडले आहेत. मंदिरे लवकरात लवकर उघडावीत, अशी त्यांची मागणी आहे. मंदिरे उघडण्याबाबत मात्र राजकीय पक्षांमध्ये मतमतांतरे पाहायला मिळत आहेत.
१) कोरोनाला परतवल्यानंतच मंदिरे उघडावीत
कोरोनाच्या काळात सर्वात मोठी जबाबदारी ही लोकांचा जीव वाचवणे आहे. खुळचट संकल्पना घेऊन काही लोक मंदिरे उघडण्याची मागणी करत आहेत. कोरोना काळात डॉक्टरांनी व सफाई कामगारांनी देवाची भूमिका बजावलेली आहे. मताचे राजकारण करण्यासाठी देवाचा उपयोग भाजपवाल्यांनी थांबवावा.
- चंद्रकांत जाधव, जिल्हाप्रमुख, शिवसेना
कोरोना संपल्यावर शासन निर्णय घेईलच
कोरोना महामारी हा प्रश्न कुठल्याही पक्षाचा नसून, सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाशी संबंधित आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या सूचनेनुसार तिसरी लाट कधीही येऊ शकते. त्यामुळे सरकार त्याप्रमाणे निर्णय घेत आहे. केरळमध्ये १ लाख पॉझिटिव्ह लोक आढळले होते. मंदिरे सुरू करायला विरोध नाही. कोरोना संपल्यावर शासन तसा निर्णय घेईलच.
- सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
लोकांच्या काळजीपोटीच मंदिरे बंद
केंद्र सरकारनेच ज्या सूचना केल्या आहेत, त्याप्रमाणे राज्य शासन अंमलबजावणी करत आहे. वास्तविक मंदिरांमध्ये वयोवृध्द, महिला आणि लहान मुले श्रध्देने येत असतात. त्यातून गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने मंदिरे बंद ठेवलेली आहेत.
- डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
लोकांच्या श्रध्देवरच राज्य शासनाचा घाला
राज्य शासनाने मंदिरे बंद ठेवून लोकांच्या श्रध्देवरच घाला घातला आहे. लोक संकटाच्या काळामध्ये देवाची आराधना करतात. मंदिरात अभिषेक केला जातो. आता श्रावण महिना सुरू असतानाही लोकांना या गोष्टी करता येत नाहीत. मंदिरावर उपजीविका असलेल्या लोकांची तर उपासमारच सुरू आहे.
- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप
२) हजार कोटींची उलाढाल ठप्प
श्रावण महिन्यात मंदिर आणि परिसरातील व्यावसायिक असा जिल्ह्यातील एकूण दोन कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे. मंदिराच्या बाहेर असलेले व्यावसायिक तसेच किरकोळ फुले विकून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे तर हालच सुरू आहेत.
३) विश्वस्त म्हणतात...
कोट..
अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिर बंद आहे. या मंदिरावर सर्व सेवाधारी व छोटे-मोठे व्यावसायिक मिळून जवळपास २०० कुटुंबांचा चरितार्थ चालतो. त्यांची उपासमार होत असून, शासनाने त्वरित सर्व मंदिरे पूर्ववत सुरू करावीत, अशी मागणी केली आहे.
- दीपकराव बडवे, पुजारी शिखर शिंगणापूर, माण
कोट...
क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील स्थानिक जनतेचा उदरनिर्वाह मंदिरावर अवलंबून असलेल्या पर्यटनावर आहे. मंदिरे अनेक महिन्यांपासून बंद राहिल्याने या लोकांवर उपासमारीची वेळ आले आहे. शासनाने मंदिरे लवकरात लवकर सुरू करून गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा.
- सुनील बिरामणे, सरपंच, क्षेत्र महाबळेश्वर