सातारा : लाचखोरीप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेली खंडाळ्याची तत्कालीन तहसीलदार सुप्रिया सुभाष बागवडे हिला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तिने उच्च न्यायालयात केलेल्या अपिलावरील निर्णयाची वाट न पाहता बुधवारी (दि. ५) हा आदेश काढण्यात आला.पारगाव येथील २८ गुंठे क्षेत्र बिगरशेती करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे अनुकूल अभिप्राय पाठविण्यासाठी सुप्रिया बागवडेने वीस हजार रुपयांची लाच २०११ मध्ये स्वीकारली होती. त्यावेळी तिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी विशेष न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी दि. २८ आॅक्टोबर २०१५ रोजी बागवडेला दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली होती. बागवडेने या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, त्यावरील निकाल येईपर्यंत तीन महिने मुदतवाढ मिळावी, अशी विनंती केली होती. तथापि, तिच्यावरील खटल्याचे गांभीर्य, विशेष न्यायालयाचा निर्णय, राज्य लोकसेवा आयोगाची शिफारस आदी बाबी विचारात घेऊन बागवडेचा नियम राज्य शासनाने फेटाळला आहे. नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम १३ च्या तसेच विभागीय चौकशी नियम पुस्तिकेतील तरतुदीनुसार उच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच तिला बडतर्फ करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
तहसीलदार बागवडे सेवेतून बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 23:53 IST