सातारा : साताऱ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन शुक्रवारी शिवप्रतापदिनाच्या सुटीदिवशीही कार्यालयात हजर राहून कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविली. जप्त केलेल्या ज्या बोटीबाबत ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते, त्या बोटीतील पाणी कर्मचाऱ्यांनी बादलीने बाहेर काढले.‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात ‘तहसील’मध्येच डेंग्यूच्या डासांची फॅक्टरी’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. राज्यभर डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असताना जिल्हा प्रशासन डेंग्यूच्या उपाययोजनेबाबत जिल्हाभर प्रबोधन करत आहे. मात्र, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान अन् आपण कोरडे पाषाण’ या उक्तीची प्रचिती सातारा तहसीलदार कार्यालयात येत असल्याचे ‘लोकमत’ने रोखठोकपणे मांडले होते. तहसीलदारांनी जी बोट जप्त केली होती. त्यात साठलेले पाणी अस्वच्छ बनले होते. त्यात बाटल्या, थर्माकोल, कागद व इतर कचरा साठला होता. तसेच या पाण्यात डेंग्यूच्या डासांची अंडीही आढळण्याची शक्यता निर्माण झाली होती. साहजिकच हजारोंच्या संख्येने या कार्यालयात येणारे नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच याठिकाणी कार्यरत असणारा कर्मचारी वर्ग, स्टँप वेंडर यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. तहसील कार्यालयाच्या आवारात पाच ते सहा कार्यालये असल्याने विविध कामांसाठी सातारा तालुक्यातील लोक याठिकाणी येत असतात. याचे गांभीर्य ओळखून ‘लोकमत’ने हे वृत्त प्रसिद्ध केले होते. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी शुक्रवारी शिवप्रतापदिनाची शासकीय सुटी असतानाही स्वत: कार्यालयात उपस्थित राहून चार ते पाच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांनी पालिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु सुटी असल्याने पालिकेतील आरोग्य कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. मग त्यांनी स्वत: कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ही स्वच्छता मोहीम राबविली. बोटीतील पाणी बादल्यांच्या साह्याने काढले. (प्रतिनिधी)लोकांच्या आरोग्याबाबत ‘लोकमत’ची भूमिका अत्यंत स्तुत्य आहे. शासकीय कामे करत असतानाही आम्हीही दक्षता पाळत असतो. या कामासाठी झोकून देत असताना स्वत:च्या आरोग्याबाबतही दक्ष राहणे आवश्यक असल्याचे मला वाटते. पालिकेच्या मदतीने तहसील आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. - राजेश चव्हाण, तहसीलदार
तहसीलदारांनी बोट केली कोरडी!
By admin | Updated: November 28, 2014 23:48 IST